मतांसाठी अश्रूपात

राहुल गांधींनी आता आपल्या प्रचारा रोख आपली आई, वडील आणि आजी यांच्याकडे नेण्याचे ठरवलेले दिसत आहे. आईचा अश्रूपात आणि वडील, आजी यांची हत्या यांचे विषय उपस्थित करून राजस्थानच्या प्रचारात राहुल गांधी यांनी भावनात्मक आवाहन केले. मतदारांच्या भावनांना हात घातला किंवा त्यांच्या मनात सहानुभूती निर्माण होईल असे मुद्दे मांडले तर मते मिळतात का हा प्रश्‍न निवडणुकीच्या विश्‍लेषणांमध्ये नेहमीच चर्चिला जातो. १९८४ साली इंदिरा गांधींची हत्या झाली. तेव्हा त्या हत्येच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन राजीव गांधी हे पंतप्रधान झाले. इंदिरा गांधी या विलक्षण लोकप्रिय होत्या आणि त्यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांनी देशातल्या लोकांच्या मनात शीखांच्या विषयी प्रचंड चीड निर्माण केली. या दोन्ही घटकांचा ङ्गायदा मिळून राजीव गांधी पंतप्रधान झाले. त्यांना त्यावेळी जे बहुमत मिळाले ते काही त्यांच्या लोकप्रियतेवर मिळाले नाही. त्यांची खरी लोकप्रियता किती हे १९८९ साली त्यांच्या पराभवाने दाखवून दिले. १९९१ साली त्यांची हत्या झाली. मात्र त्या हत्येच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसला ङ्गार मोठे यश मिळाले नाही. आता राहुल गांधी आपल्या आजीच्या आणि वडिलांच्या हत्यांच्या भांडवलावर मतांची काही बेगमी होते का याचा शोध घेत आहेत. काही कारण नसताना आपल्या घराण्यातल्या या दोघांचे हौतात्म्य एन्कॅश करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

गेल्या आठवडा भरातल्या त्यांच्या भाषणांवर नजर टाकली तर आता त्यांनी सहानुभूतीचे अस्त्र वापरण्याचे ठरवले आहे असे लक्षात येते तसे पाहिले तर राहुल गांधींची ही नवी चाल त्यांच्या डोक्यातून आलेली नाही. त्याबाबतीत अगदीच बालबुध्दीचे आहेत. मात्र त्यांना सल्ले देणारे आणि त्यांची भाषणे लिहून देणारे काही चतूर लोक अशा युक्त्या करत आहेत. म्हणूनच राहुल गांधींनी आक्रोशाचा सूर लावलेला आहे. आपल्या पक्षाचा विकासाचा कार्यक्रम जनतेसमोर ठेवण्याऐवजी लोकांची सहानुभूती मिळवण्यावर त्यांनी भर द्यावा असे त्यांना त्यांची भाषणे लिहिणार्‍यांनी सूचित केले आहे. त्यांनी गेल्या आठवड्यात आपल्या आईच्या आजाराचा आणि अन्न सुरक्षा विधेयकासाठी टिपे गाळल्याचा उल्लेख केला होता. कॉंग्रेसच्या नेत्यांना निवडणुका जवळ आल्या की जनतेच्या दु:खाचे दर्शन होते आणि रडायला येते. तेव्हा सोनिया गांधी यांचे ते लोकांना तरी न दिसलेले पण केवळ राहुल गांधी यांनाच दिसलेले अश्रू खरे होते की नक्राश्रू होते याबद्दल शंका येते.

विशेषत: कॉंग्रेसच्या नेत्यांचे आजवरचे जनतेला ङ्गसवण्याचे प्रकार पाहिल्यावर तरी सोनिया गांधी यांच्या त्या कथित अश्रुपाताची वार्ता घडलीच नसणार याची खात्री पटते. पण त्या केवळ राहुल गांधी यांच्यासमोरच रडल्या असतील तर त्या मागचे कारण वेगळेच असणार. अन्न सुरक्षा विधेयक नावाची ङ्गसवणूक करून तरी आपला हा दिवटा पंतप्रधान होईल की नाही अशी शंका आल्यामुळे त्या नक्कीच रडल्या असतील. आता राहुल गांधी यांनी राजस्थानात भाषणे करताना, आपल्या आजीचे आणि वडलांचे कथित हौतात्म्य वापरत आहेत. ‘त्यांनी’ (म्हणजे कोणी?) माझ्या आजीला मारले, पुन्हा ‘त्यांनी’ माझ्या वडलांनाही मारले आणि ते आता मलाही मारतील असे नाटक त्यांनी केले. भाषणातल्या या ओळी (डायलॉग) म्हणून झाल्या की, त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या हिंसाचाराच्या राजकारणा वर चार ओळी म्हटल्या. आपल्या आजीला आणि वडिलांना मारणारे भाजपाचेच लोक होते असे काही त्यांनी स्पष्टपणे म्हटले नाही. पण आजी आणि वडलांच्या संदर्भातले डायलॉग संपताच भाजपावर आरोप केले. आपल्या आजीला आणि वडलांना भाजपाच्या लोकांनी मारले आहे आणि आता तेच लोक आपल्याला मारायला टेकले आहेत असे त्यांना या संवादातून सूचित करायचे आहे. लोकांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. पण लोकांना त्यातले तथ्य कळते. लोकांच्या मनात सहानुभूती निर्माण व्हावी म्हणून राहुल गांधी हे आजीच्या हत्येच्या वेळचे वर्णन करीत असतात. पण त्यांनी हे लक्षात ठेवावे की त्यांच्या या नकली अश्रूंचा परिणाम होणार नाही.

कारण त्यांच्या आजीच्या आणि वडलांच्या हत्येचा भाजपाशी काही संबंध नाही. या दोघांची हत्या ज्यांनी केली ते काही आता निवडणुकीत उभे नाहीत. तेव्हा या दोन हत्यांची आता चर्चा करण्याचे काही औचित्य नाही. पण हातात काहीच विधायक कार्यक्रम नसलेले राहुल गांधी नको असलेले विषय उपस्थित करून आपल्या पक्षाच्या आणि सरकारच्या अपयशावरून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या आजी म्हणजे इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी या दोघांच्या हत्या त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे झाल्या आहेत. इंदिरा गांधी यांनी पंजाबात दुहीचे राजकारण केले. राजीव गांधी यांनी श्रीलंकेतल्या बंडखोरांना मदत केली आणि नंतर त्यांचा बंदोबस्त करायला आपलेच जवान तिथे पाठवले. या राजकारणातून त्यांची हत्या झाली. राहुल गांधी आपल्या आजीची आणि वडलांची हत्या ‘त्यांनी’ केली असे म्हणत आहेत पण त्यांनी म्हणजे कोणी याचा उल्लेख का करीत नाहीत ? न्यूनगंड निर्माण झालेल्या नेत्याप्रमाणे ते मूळ प्रश्‍न बाजूला ठेवून देशाच्या हिताच्या गोष्टीवर का बोलत नाहीत ?