नवी दिल्ली – जपान आणि चीनप्रमाणे ताशी ३०० कि.मी. वेगाच्या रेल्वेगाड्या भारतात सुरू करणे आता तरी शक्य नाही. कारण त्यासाठी स्वतंत्र मार्ग टाकावे लागतील आणि पूर्ण लोहमार्गावर दोन्ही बाजूंनी कुंपण करावे लागेल. यावर प्रचंड पैसा खर्च होईल म्हणून तूर्तास तरी भारतीय रेल्वेने आहे त्याच पायाभूत सोयींच्या साह्याने काही निवडक मार्गांवर गाड्यांचा वेग ताशी १६० ते २०० कि.मी. पर्यंत वाढविण्याचा विचार सुरू केला आहे.
शताब्दी, राजधानी आणि दुरांतो या प्रकारच्या मोठ्या शहरांच्या दरम्यान धावणार्या वेगवान गाड्यांचा वेग वाढवून तो १६० ते २०० कि.मी. च्या दरम्यान नेण्याचा सुरुवातीला प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अरुणेंद्र कुमार यांनी दिली. या वेगवान गाड्या नेमक्या कधी धावतील हे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला.
अशा वेगवान गाड्या नेमक्या कोणत्या मार्गावर पळवाव्यात यासाठी मार्गांचा अभ्यास केला जात आहे. दिल्ली-भोपाळ आणि दिल्ली-चंडीगढ या मार्गावर अशा गाड्या पळवल्या जाऊ शकतात असे आढळले आहे. त्याशिवाय अशा मार्गावरील लोकांची वर्दळ आणि जनावरांचे ङ्गिरण्याचे प्रमाण याचाही अभ्यास करावा लागणार आहे. या मार्गावरील सिग्नलची व्यवस्था बदलावी लागेल आणि ज्या गाड्या पळवायच्या असतील त्यांची इंजिने आणि डबे यांचीही रचना बदलावी लागेल. कारण या मार्गावर कमी वजनाचे डबे पळवावे लागतात आणि त्यांची चाकेही बदलावी लागतात.
एकदा अशा गाड्या सुरू केल्या की, वेळापत्रकात सुद्धा मोठे बदल होतात. सध्या भारतातील सर्वाधिक वेगाची गाडी दिल्ली आणि भोपाळ दरम्यान धावते. ही शताब्दी गाडी ताशी सरासरी ११० कि.मी. वेगाने धावते. या प्रवासातले दिल्ली ते आग्रा हे अंतर ही गाडी ताशी १३० कि.मी. वेगाने कापते. देशातल्या सगळ्याच राजधानी गाड्या सरासरी ताशी ९० कि.मी. वेगाने धावतात आणि त्यांच्या प्रवासातला कमाल वेग ताशी ११० कि.मी. असतो.