भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार हर्ष वर्धन

नवी दिल्ली – दिल्लीतील भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून डॉ. हर्ष वर्धन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या ४ डिसेंबरला दिल्ली विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने प्रस्तावित मुख्यमंत्री म्हणून डॉ. हर्ष वर्धन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, नितीन गडकरी आणि अनंतकुमार हे उपस्थित होते.

दिल्ली भाजपाचे अध्यक्ष विजय गोयल यांनी पक्षाने आपले नाव जाहीर करावे, अशी मागणी केली होती. परंतु तसे होत नाही हे लक्षात येताच त्यांच्या समर्थकांनी नितीन गडकरी यांच्या घरासमोर निदर्शने केली होती. त्यामुळे पक्षाला ठाम निर्णय घ्यावा लागला. डॉ. हर्ष वर्धन हे ५९ वर्षांचे आहेत. १९९३ सालपासून ते पूर्व दिल्ली मतदारसंघातून सातत्याने निवडून आलेले आहेत. १९९३ ते १९९८ या काळात त्यांनी दिल्लीचे आरोग्य मंत्री म्हणून काम केले होते आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कामाची दखल पूर्ण देशाने घेतली होती.

डॉ. हर्ष वर्धन यांची प्रतिमा स्वच्छ आहे ही एक त्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे पक्षाने त्यांच्या नावाला मंजुरी दिली. श्री. विजय गोयल यांनी सुरुवातीच्या स्वत:च्या नावाचा आग्रह धरला असला तरी आता मात्र त्यांनी हर्ष वर्धन यांच्या नावाच्या घोषणेचे स्वागत केले आहे. दिल्ली विधानसभेच्या ७० जागा आहेत आणि त्यासाठी ४ डिसेंबरला मतदान होणार आहे. विशेष म्हणजे दिल्लीच्या निवडणुकीत काय होईल याचा अंदाज घेण्याकरिता मतदारांची सर्वेक्षणे केली जात आहेत आणि प्रत्येक सर्वेक्षणात वेगवेगळे निष्कर्ष हाती येत आहेत. त्यामुळे मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे.

Leave a Comment