टीम इंडियाचे वनडेमधील अव्वलस्थान कायम

रांची– बुधवारचा टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी वनडे पावसामुळे रद्द करण्यात आली. जेएससीए स्टेडियमवरील ही लढत पावसामुळे वाया गेली. हा सामना रद्द झाला तरी आता भारताने आयसीसी वनडे रँकिंगमधील अव्वल क्रमांक कायम राखले आहे. ऑस्ट्रेलिया व सध्या रँकिंगमध्ये अव्वल असलेला टीम इंडिया यांच्यात वनडे रँकिंगमधील अव्वल स्थानासाठी चुरस होती .

ऑस्ट्रेलियाला अव्वल क्रमांकावर विराजमान होण्यासाठी सात वनडेंच्या मालिकेतील किमान सहा लढती जिंकणे आवश्यक होते. आता मात्र रांची वनडेवर पावसाचे पाणी पडल्याने ऑस्ट्रेलियाला सहा सामने जिंकता येणार नाहीत . पावसामुळे सामना थांबला तेव्हा २९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणा-या टीम इंडियाने ४ . १ षटकांत बिनबाद २७ धावा केल्या होत्या.

बुधवारी संध्याकाळी ६.१८ च्या सुमारास पावसाला सुरुवात झाल्याने सामना थांबला. मध्येच पाऊस थांबल्याने सामना सुरू होईल असे वाटत होते. मैदानातील माळ्यांनी पाणी काढण्यासाठी सुपरसॉपरही आणला, पण पुन्हा पावसाला सुरुवात झाली. अखेर पंचांनी मैदानाची पहाणी केली. मैदानात बरेच पाणी साचल्याने सामना रद्द करण्यात आला. मालिकेत सध्या ऑस्ट्रेलिया २ – १ अशा आघाडीवर असून पाचवा वनडे सामना शनिवारी कटकच्या बाराबाटी स्टेडियमवर होईल. हा सामना रद्द झाला तरी आता भारताने आयसीसी वनडे रँकिंगमधील अव्वल क्रमांक कायम राखले आहे.

Leave a Comment