गायक मन्ना डे यांचे निधन

बेंगळरू- बेंगळुरू येथील रूग्णालयामध्ये ख्यातकीर्त गायक मन्ना डे (९४) यांचे प्रदीर्घ आजाराने गुरुवारी निधन झाले. मूत्रपिंडाच्या विकारामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना रूग्णालयातील अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते. गुरूवारी पहाटे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. पद्मश्री, पद्मभूषण, दादासाहेब फाळके हे मानाचे पुरस्कार देवून मन्ना डे यांचा गौरव करण्याआत आला होता.

मन्ना डे यांचे मूळ नाव प्रबोध चंद्र डे असे होते. मात्र, हिंदी चित्रपटसृष्टीत ते मन्ना डे म्हणूनच ओळखले जात. त्यांचा जन्म १९१९ मध्ये झाला. त्यांनी १९४३ मध्ये गायक म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. मन्ना यांनी त्यांच्या खास शैलीतील आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्या काळातील आघाडीचे अभिनेते राज कपूर यांच्यासाठी त्यांनी अनेक गाणी गायली होती.

तमन्ना(१९४३) या सिनेमापासून पार्श्वगायनाला सुरूवात करणाऱ्या मन्ना डे यांना मशाल(१९५०) या पहिल्या गाजलेल्या चित्रपटाने ओळख मिळवून दिली. ‘आनंद’ चित्रपटामधील मन्ना यांनी गायलेले ‘जिंदगी कैसी है पहेली’ गाण्याचे बोल आजही सहज ओठांवर येतात. हिंदी, मराठी, बंगाली, आसामी, मल्याळी, कन्नड, गुजराती, पंजाबी, भोजपुरी अशा विविध भाषांमधून त्यांनी पार्श्वगायन केले होते.

काव्याचे गाढे अभ्यासक असलेल्या मन्ना डे यांचे भारतीय शास्त्रीय संगीतामधील योगदान अनन्यसाधारण असेच आहे. ‘ये मेरी जोहरजबी’ या ‘वक्त'(१९६५) सिनेमातील गाण्याचे बोल देखील मंत्रमुग्ध करणारे आहेत. मन्ना डे यांनी गायलेली ‘प्यार हुआ इकरार हुआ’, ‘पुछोना कैसे’, आणि ‘लागा चुनरी मे दाग’ ही काही अजरामर गाणी आहेत. त्यां च्यास निधनामुळे बॉलीवूडमध्येा मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Leave a Comment