नवी दिल्ली – बाजारात कांद्यांच्या भावाने गाठलेली शंभरी लक्षात घेऊन सरकारने कांदा आयातीसाठी प्रयत्न सुरू केले असताना पाकिस्तानचा कांदा मोठ्या प्रमाणावर भारतात येऊ लागला असल्याचे समजते. भारतातील कांदा टंचाईचा सर्वाधिक फायदा पाकिस्तानी व्यापारी आणि निर्यातदार यांनाच होणार आहे कारण पाक भारत रस्त्याने जोडले गेले असल्याने हा कांदा जलद गतीने भारतीय बाजारात पोहोचू शकत आहे.
सरकारी एजन्सी नाफेड ने पाकिस्तानबरोबरच चीन, इराण व इजिप्त देशांकडून कांदा खरेदीचे प्रयत्न सुरू केले आहेत. शिवाय खासगी आयातदारांनाही कांदा आयातीच्या परवानग्या दिल्या गेल्या आहेत. मात्र पाक व्यापार्यांयसाठी भारताचा बाजार सोन्याची खाण ठरू लागला आहे. इतकेच नव्हे तर सध्या जो अफगाणिस्तानातून आलेला कांदा म्हणून सांगितले जात आहे, तोही पाकमधूनच आला असल्याचे समजते. पाकच्या बलुचिस्तानात कांदा पीक चांगले आहे आणि तोच कांदा सध्या भारतात येत आहे. सिध प्रांतातील कांदा आवकही पुढील कांही दिवसांत सुरू होत आहे.
पाकिस्तानात कांदा २५ ते ३० रूपये किलो आहे. निर्यात करताना तो ५० रूपये दराने केला जातो. मात्र हा कांदाही भारतातील सध्याचे कांद्याचे दर पाहता स्वस्तच पडतो असे व्यापार्याचे म्हणणे आहे.