सीबीआयने पंतप्रधान कार्यालयाकडून मागितल्या फाईल्स

नवी दिल्ली – कोळसा खाण वाटप घोटाळयाचा तपास करणा-या केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभागाने (सीबीआय) पंतप्रधान कार्यालयाकड़ून हिंडाल्को कंपनीला झालेल्या खाण वाटपाशी संबंधित सर्व फाईल्स मागितल्या आहेत. सीबीआयने यासाठी पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवले आहे. प्रत्यक्ष तपासाला सुरुवात करण्यापूर्वी सीबीआय या सर्व फाईल्सची तपासणी करणार आहे.

या प्रकरणात सीबीआयने बिर्ला समूहाचे प्रमुख कुमार मंगलम बिर्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभागाने (सीबीआय) मंगळवारी कोळसा खाण वाटप घोटाळयाच्या तपासाचा स्थिती अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. सीबीआयने स्थिती अहवालात या घोटाळयाच्या तपासात आतापर्यंत झालेल्या प्रगतीची माहिती न्यायालयाला दिली आहे. या घोटाळयात कंपन्या, उद्योगपती आणि नोकरशहांना आरोपी बनवण्यात आले आहे.

या घोटाळयात सीबीआयने नुकताच उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, त्यांची कंपनी हिंडाल्को आणि माजी कोळसा सचिव पी.सी.पारेख यांच्या विरोधात 14 वा एफआयआर दाखल केला. सीबीआयने स्थिती अहवालात या एफआयआरची माहिती सुध्दा न्यायालयाला दिली असण्याची शक्यता आहे. या खटल्याची अखेरची सुनावणी 29 ऑगस्टला झाली होती. त्यावेळी न्यायालयाने संथगतीने तपास सुरु असलेल्या असल्याबद्दल सीबीआयवर ताशेरे ओढले होते.

तुमचा तपास अजून पहिल्या गेअरवर सुरु आहे. तुमच्या तपासाने वेग पकडणे आवश्यक आहे. तुमच्यासमोर फार मोठे लक्ष्य असून तुम्हाला तर्कसंगत निष्कर्षापर्यंत पोहोचायचे आहे अशा शब्दात न्यायमूर्ती आर.एम.लोढा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सीबीआयची कानउघडणी केली होती. या सुनावणीनंतर सीबीआयने नियमबाहय पध्दतीने बिर्ला समूहातील कंपनीला खाण वाटप झाल्याबद्दल कुमार मंगलम बिर्ला, हिंडाल्को आणि पी.सी.पारेख यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला.