जम्मू – तुम्ही आमच्यासाठी हिरो आहात. आम्ही सर्व देशवासी तुमच्याबरोबर आहोत. अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जम्मू-काश्मीर दौर्यात सीमेवरील जवानांना प्रोत्साहित केले. पाकिस्तानकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) सतत सुरू असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाचा आढावा आणि सीमावर्ती भागात पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आज (मंगळवार) शिंदे यांनी केली.
त्यांच्यासोबत जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्लाही होते. पाकिस्तानकडून यावर्षी सीमेवर 136 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांशी शिंदे यांनी संवाद साधला. तसेच सांबा आणि हिरानगर येथील काही चौक्यांची पाहणी केली. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, की सीमेवरील कारवायांमध्ये वाढ झाल्याने केंद्र सरकार चिंतेत आहे. गेल्या वर्षीच्या घटनांपेक्षा यंदा सीमेवरील घटनांमध्ये वाढ झाली आहे. याबाबत लष्करी अधिकार्यांशी चर्चा करण्यात येत आहे.