नारायण साई प्रकरणाच्या तपास अधिकार्‍याला धमकी

सुरत – नारायण साई प्रकरणाच्या तपास अधिकारी पोलिस उपायुक्त शोभा भुतडा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आसाराम बापू आणि नारायण साई यांच्याविरोधात गुन्हा दाखल त्यांचे सहाय्यक गुंडगिरीवर उतरले आहेत.

मागील तीन दिवसांपासून धमकी मिळत असल्याचं डीसीपी शोभा भुतडा यांनी म्हटलं आहे. भुतडा यांनी सूरतच्या उम्र पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या माहितीनुसार, त्यांच्या सरकारी मोबाईलवर दोन वेळा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. नारायण साईला शोधण्याचा प्रयत्न करु नका नाहीतर मारुन टाकू, अशी धमकी एका व्यक्तीने भुतडा यांना दिली.

तक्रारीनुसार, शोभा भुतडा यांना पहिल्यांदा 16 ऑक्टोबरला दुपारी 3.34 वाजता त्यांच्या मोबाईलवर कॉल आला. कॉल करणार्‍या व्यक्तीने आपली ओळख नारायण साईचे सहाय्यक म्हणू सांगितली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दोन दिवसांनी 18 तारखेला सकाळी 9.42 पुन्हा त्याच नंबरवरुन कॉल आणि पुन्हा धमकी दिली.

आयपीएस शोभा भुतडा सुरत पोलिसांत झोन 4ची पोलिस उपायुक्त आहेत आणि त्याच नारायण साईंच्याविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपास अधिकारी आहेत. धमकी मिळाल्याची तक्रार केल्यानंतर धमकी देणार्‍याचा पोलिस तपास करत आहेत.

Leave a Comment