ऐकावे ते नवलच – हुंडा म्हणून देतात २१ विषारी साप

आपल्या भारत भूमीत काय  काय घडेल हे कधीच कोणी सांगू शकणार नाही. छत्तीसगड राज्यातील महासमुंद जवळील जोगीडेरा गावात अशीच एक अनोखी प्रथा वर्षानुवर्षे प्रचलित आहे. मुलगी उपवर झाली की वधूपिता डॉक्टर, इंजिनिअर किमान सुशिक्षित वरांचा शोध घेतो ही झाली सामान्य प्रथा. पण या गावात मुलगी उपवर झाली की कोणाकडे अधिकाधिक विषारी साप नाग आहेत याचा शोध वधूपिते घेतात. इतकेच नव्हे तर मुलीला लग्नात हुंडा म्हणून सोनेचांदी अथवा रोकड न देता २१ अतिविषारी साप नागच भेट म्हणून देतात.

जोगीडेरा ही गारूडी लोकांचीच वस्ती असून येथे ४० गारूडी घरे आहेत. मात्र त्यात जितकी माणसे नाहीत त्यापेक्षा कितीतरी अधिक संख्येने साप नाग आहेत. ही जात आपल्या परंपरा आणि रितीरिवाज काटेखोरपणे पाळतात. या राज्यातील अन्य आदिवासीपेक्षा त्यांच्या प्रथा निराळ्या आहेत.. मुलगी उपवर झाली की आपल्या जमातीत कोणाकडे अधिक साप नाग आहेत याचा शोध वधूपिता घेतो. राज्यात सहा सात ठिकाणी या जातीचे गारूडी आहेत तेथे हा तपास केला जातो. हुंडा देतानाही वधूपित्याला २१ साप देणे जमले नाही तर शेजारीपाजारी त्याला साप पकडायला मदतही करतात.

येथे घरात मूल जन्मले की त्याला खेळण्यांच्या जागी साप नागच दिले जातात. विषारी सापांच्या विषग्रंथी काढल्या जातात व त्यापुन्हा येईपर्यंत कांही महिने जातात. पण समजा एखाद्याला नाग सापाने दंश केलाच तर झाडपाल्याचा उपचार केला जातो. या जमातीचा मुखिया कृष्णा नेताम सांगतो, आमच्याकडे २१ हा आकडा शुभ मानला जातो. म्हणून २१ साप नाग देण्याची प्रथा आहे. हुंड्यात मिळालेले हे नाग साप दोन महिने घरात ठेवले जातात व नंतर त्यांची वंशवाढ व्हावी म्हणून जंगलात अथवा शेतात सोडले जातात. आहे ना नवल !

Leave a Comment