रशीद मसूद यांचे खासदारपद रद्द

नवी दिल्ली – कॉंग्रेसचे खासदार रशीद मसूद यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकृत आदेश काल काढण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने जुलै महिन्यामध्ये दिलेल्या एका निर्णयात एखाद्या आमदार किंवा खासदाराला शिक्षा सुनावली जाताच त्याचे आमदार किंवा खासदारपद ताबडतोब रद्द व्हावे, असा आदेश दिला होता. त्या आदेशाचा पहिला बळी रशीद मसूद हे ठरले आहेत.

रशीद मसूद (वय वर्षे ६७) यांना गेल्या आठवड्यात त्रिपुराच्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशाच्या प्रक्रियेत केलेल्या भ्रष्टाचाराबद्दल चार वर्षे तुरुंगवासाची सजा ङ्गर्मावण्यात आली आहे. १९९० साली केंद्रात सत्तेवर असलेल्या नॅशनल ङ्ग्रंट या आघाडीच्या सरकारमध्ये ते आरोग्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशात काही घोटाळे केले होते. त्या संबंधात त्यांच्यावर खटला चालला आणि त्यांना चार वर्षांची सजा सुनावण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांचे खासदारपद रद्द करण्यात आले आहे. माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनाही १९९६ च्या चारा घोटाळ्यात पाच वर्षाची सजा झालेली आहे. त्यामुळे त्यांच्याही डोक्यावर खासदारपद रद्द होण्याची तलवार टांगलेली आहे आणि लवकरच त्यांचेही खासदारपद रद्द होणे अपरिहार्य आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचा पहिला बळी ठरण्याचा मान रशीद मसूद यांना मिळाला आहे.