नेवाडा शाळेतील गोळीबारात शिक्षक ठार

नेवाडा – येथील माध्यमिक शाळेत अज्ञात विद्यार्थ्याने सेमी अॅटोमॅटिक हँडगनच्या सहाय्याने केलेल्या बेछूट गोळीबारात शाळेतील गणिताचे शिक्षक मायकेल लँडसबेरी यांचा मृत्यू झाला तर अन्य दोन १२ वर्षीय मुले जखमी झाली आहेत. हल्लेखोराने नंतर स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्त्या केली आहे. गोळीबार सुरू होताच शाळेतील सुमारे ७०० विद्यार्थ्यांना अन्यत्र हलविण्यात आले.

आठवडाभराच्या सुट्टीनंतर शाळा सुरू झाली तेव्हा शाळा भरण्याअगोदरच शाळेत घुसलेल्या या हल्लेखोराने अचानक गोळीबार करायला सुरवात केली तेव्हा विद्यार्थ्यांत एकच घबराट उडाली. गोळीबारापासून विद्यार्थ्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात लँडसबेरी हे शिक्षक ठार झाले. अन्य दोन मुलांपैकी एकाला खांद्यात तर दुसर्यातला पोटात गोळी लागली असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गेल्याच वर्षी न्यू टाऊन येथील सँडी हूक प्राथमिक शाळेत अशीच गोळीबाराची घटना घडली होती व त्यात निष्पाप २६ जणांचा जीव गेला होता. त्यानंतर शस्त्र बाळगणे प्रकरणावर अनेक चर्चा आणि वादविवाद घडले होते.शाळेतील शिक्षकांना संरक्षणासाठी हत्यारे देण्याबाबतही चर्चा झाल्या होत्या. आत्ताच्या गोळीबारात बळी पडलेले लँडसबेरी हे माजी सैनिक असून त्यांनी अफगाणिस्तानातील दोन युद्धात भाग घेतला होता असेही समजते.

Leave a Comment