उत्तम सौंदर्य प्रसाधन : डाळीचे पीठ

विविध साबणांच्या जाहिरातींमध्ये मॉडेल म्हणून काम करणार्‍या एका चित्रपट तारकेला एका पत्रकाराने मोठा विचित्र प्रश्‍न विचारला. तुम्ही एवढ्या जाहिरातींमध्ये मॉडेल म्हणून काम करता मात्र तुम्ही स्वत: नेमके कोणते साबण वापरता? तुमच्या सौंदर्याचे रहस्य कोणत्या साबणात दडलेले आहे? त्या चित्रपट तारकेने मंद स्मित करून उत्तर दिले, ‘माझ्या सौंदर्याचे रहस्य डाळीच्या पिठात दडलेले आहे.’ पत्रकार आचंबित झाला. परंतु अजून सुद्धा भारतामध्ये अशा अनेक महिला आहेत की, ज्या शरीराला साबणाचा स्पर्श होऊ देत नाहीत. तरी त्यांची त्वचा चांगली आहे, त्या सुंदर आहेत.

जुन्या काळात जेव्हा साबण उपलब्धच नव्हते तेव्हा लोक डाळीचे पीठ अंगाला लावून आंघोळ करत होते आणि आता सुद्धा अगदी आधुनिक काळातही डाळीच्या पिठाचा साबणासारखाच नव्हे तर इतर अनेक प्रकारांनी सौंदर्य प्रसाधन म्हणून वापर केला जात आहे. डाळीचे पीठ म्हणजे हरभर्‍याच्या डाळीचे पीठ ज्याला सध्या बेसन पीठ म्हणण्याची पद्धत आहे. बेसन पिठाचे दुधात मिश्रण करून ते मिश्रण चेहर्‍याला लावल्यास चेहरा विलक्षण तजेलदार होतो. हे मिश्रण करताना त्यात थोडी हळद मिसळावी. हे मिश्रण चेहर्‍याला २० मिनिटे लावून ठेवावे आणि नंतर कोमट पाण्याने धुवावे.

अशा प्रकारचे मिश्रण वर्षानुवर्षे वापरले जात आहे. परंतु आता बेसन पिठाच्या वापराचे अधिक संशोधन करून त्याला अधिक शास्त्रीय रूप दिले जात आहे. बेसन पीठ दुधाच्या ऐवजी गुलाब पाण्यात मिसळून त्याचे मिश्रण चेहर्‍याला लावले तर त्याचा गुण अधिक चांगला येतो, असे अलीकडच्या प्रयोगात आढळले आहे. मात्र हे मिश्रण कोरड्या त्वचेच्या लोकांनी वापरायचे नाही. तेलकट त्वचेच्या लोकांनी ते वापरले की, तेलकटपणा कमी होतो.

कोरड्या त्वचेच्या लोकांसाठी तेलकटपणा कमी करण्याचा प्रश्‍नच येत नाही. तेव्हा अशा लोकांनी बेसन पीठ आणि मध यांचे मिश्रण करावे. त्यात थोडे दूध आणि किंचित हळद पावडर टाकावी. आठवड्यातून एकदा हे मिश्रण चेहर्‍याला २० मिनिटांसाठी लावावे. त्यामुळे त्वचा ओलसर होते. उन्हामुळे पडणारे काळे डाग कमी करण्यासाठी बेसन पीठ आणि बदामाच्या बियांची पावडर यांचे मिश्रण करावे. ते दुधात कालवावे आणि त्यात चार थेंब लिंबाचा रस घालावा. हे मिश्रण चेहर्‍यावर ३० मिनिटे ठेवावे. उन्हामुळे पडलेले चेहर्‍यावरचे काळे डाग नाहीसे होतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment