स्मार्ट मीटरमुळे येणार वीज बिलामध्ये पारदर्शीपणा

नवी दिल्ली – विजेच्या दरांमध्ये दर दोन तीन महिन्यांनी वाढ केली जात असल्याने ग्राहक वैतागून जात आहेत. आपल्याला येणारे बिल बरोबर आहे की नाही याची वीज ग्राहकाला नेहमीच शंका वाटत असते. ग्राहकांच्या मनातील बिलाविषयीच्या शंका दूर करण्यासाठी सरकार पाऊल टाकणार आहे.

या बिलावरून आपण दररोज कोणत्या वेळेला जास्त वीज वापरतो हे ग्राहकांच्या लक्षात येणार आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, वीज बिल अधिक पारदर्शी व्हावे यासाठी सर्व राज्यांच्या वीज मंडळांशी चर्चा चालू आहे. ग्राहकांना आपण कोणत्या वेळेला वीज वापरल्यामुळे वीज बिल जास्त आले याची माहिती जर मिळू शकली तर त्या विशिष्ट वेळेत ग्राहक वीजेचा वापर कमी करू शकतील.

यासाठी अशी माहिती ग्राहकांना वीजेच्या बिलामध्येच उपलब्ध करून देण्याची केंद्र सरकारची योजना असल्याचे ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले. मोबाईल ग्राहकांना त्यांच्या प्रत्येक कॉलचा हिशोब दिला जातो त्याप्रमाणेच वीज ग्राहकांनाही त्यांच्या वीज वापराविषयी सविस्तर माहिती दिली तर त्यांना आपल्या वीज वापराचे नियोजन करता येणे शक्य होणार आहे.

केंद्र सरकारची स्मार्ट मीटर ही योजना प्रत्यक्षात आल्यानंतर ग्राहकांना अशा पद्धतीचे बिल देणे सोपे होणार आहे. स्मार्ट मीटर तयार करण्यासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने 600 कोटी रुपयांची योजना आखली आहे. त्यानुसार देशभरातील ग्राहकांना स्मार्ट मीटर वाटपाची प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे. स्मार्ट मीटरमुळे वीज बिलामध्ये अधिक पारदर्शीपणा येऊ शकणार आहे.

Leave a Comment