राजधानीत यापुढे मोर्चा आणि आंदोलने नाहीत

ढाका – बांग्लादेश सरकारने राजधानी ढाक्का शहरात मोर्चा,जन आंदोलने काढण्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची घोषणा केली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांतील राजकीय हिंसाचारातून निर्माण होणा-या वाढत्या तणावाच्या पाश्वभूमीवर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या आपल्या निवडणूक कार्यक्रमाबाबतच्या निर्णयावर ठाम असून त्यांनी विरोधकांकडून संसदेच्या बरखास्तीची मागणी करणारी आंदोलने दडपून टाकण्यासाठीच असा पवित्रा घेतला आहे,असा आरोप प्रमुख विरोधी पक्षनेत्या खलिदा झिया यांनी केला आहे.

खलिदा झिया यांनी मागच्या आठवड्यात सध्याच्या सरकारने संसद बरखास्त करून निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी करत राजधानीत विराट मोर्चा काढणार असल्याचे नमूद केले होते. या पाश्वभूमीवर पंतप्रधान हसीना यांनी राजधानीच्या शहरात कुठल्याही परिस्थीतीत हिंसाचार होता कामा नये, यासाठी आपण हा निर्णय घेतला असून त्यासाठी लष्कराच्या विशेष तुकड्या तैनात केल्या असल्याची माहिती दिली आहे.