
आपली अर्थव्यवस्था आता अशा एका वळणावर येऊन ठेपली आहे की, तिला आपण भोगवादी म्हणून हिणवत असलो तरीही तीच आता आपला जीवनक्रम झाली आहे आणि तीच आपली जीवनपद्धतीही झाली आहे. आपली प्रगती आता भोगवादातूनच होणार आहे. तेव्हा आता भोगवादाला सोडचिठ्ठी देता येणार नाही. १९९१ साली उपभोक्तावादाला खरेदिया रोग म्हणून हेटाळले जात होते. आपली जीवन पद्धती आधी वेगळी होती. आपण आज ज्यांना ग्राहकोपयोगी वस्तू म्हणतो त्या सगळ्या वस्तू आधी चैनीच्या वस्तू म्हणून ओळखल्या जात होत्या. अशा चैनीच्या वस्तू खरेदी करू नयेत तर साधे रहावे. पैसा वाचवावा अशी आपली धारणा होती पण आता अधिकाधिक खरेदी करावी अशी धारणा झाली आहे. अर्थव्यवस्थेने एका अशा चक्रात प्रवेश केला आहे की, जिथे उपभोक्तावाद हाच अर्थव्यवस्थेचा आधार होऊन बसतो. ही अर्थव्यवस्था बचतीऐवजी खर्च करत राहण्याला प्रोत्साहन देत असते.मात्र
दिवाळी आली की,लोकांची खरेदीसाठी झुंबड उडते. घरात काही तरी नवे खरेदी करण्याची हीच पर्वणी असते. भारतात दिवाळीचा सण सर्व प्रांतात साजरा होतो आणि पूर्ण देशात काही लाख कोटी रुपयांची उलाढाल होते. देशाच्या अर्थव्यवस्थेत ही मोठ्या व्यवहाराची ही पर्वणी असते.
तसा भारतीयांचा ओढा साधेपणाकडेच आहे असे मानले जाते. परंतु मुक्त अर्थव्यवस्थेच्या स्वीकारानंतर आपण भोगवादाकडे झुकलो आहोत. आपल्या जीवनातली विसंगती अशी की, आपल्याला भोगवाद, चांगले राहणीमान मनापासून आवडते. परंतु आपण बोलताना मात्र भोगवादाला नाकडोळे मोडतो. आपल्या मनात कसल्याही भावना असोत आणि आपण कशाही भावना व्यक्त करीत असो आपल्या जीवनात भोगवाद ही अपरिहार्यता ठरली आहे. दिवाळीत या भोगवादाचा अनुभव येत असतो. भोगवाद म्हणजे जीवनाचा आनंद लुटणे. या आनंदाच्या अनेक परी आहेत. भौतिक आनंद आणि भौतिक सुख याविषयी आपल्या अध्यात्म शास्त्रामध्ये कितीही विपरित टिप्पणी केलेली असली तरी उपभोक्तावादातूनच प्रगती होईल असे दिसायला लागले आहे. उपभोक्तावाद वाढला तर लोक वस्तूंची खरेदी करतात. वस्तूंची खरेदी वाढली तरच त्यांचे उत्पादन वाढते, त्यांचे उत्पादन वाढले तरच रोजगार वाढतो आणि रोजगार वाढला तर लोकांच्या हातात पैसा येऊन लोक वस्तू खरेदी करतात. एकंदरीत आताची अर्थव्यवस्था ही भोगवादाकडून भोगवादाकडे जाणारी आहे आणि भोगवादातूनच प्रगती साधणारी आहे. आपल्याला भोगवाद कितीही वाईट वाटला तरी भोगवाद संपल्यास प्रगती साध्य होणार नाही हे लक्षात ठेवले पाहिजे.
भौतिक सुखाची लयलूट करण्यास आपण जीवाची दिवाळी करणे असे म्हणतो आणि दिवाळीमध्ये लोक भरपूर आनंद लुटत असतात. हा आनंद भरपूर लुटता यावा यासाठी जी अनुकूल परिस्थिती लागते ती या देशात निर्माण झालेली नाही. लोक महागाईमुळे त्रस्त झालेले आहेत. मग ते खरेदी करणार कोठून? आणि खरेदी नाही केली तरी उत्पादन वाढणार कसे, हा प्रश्न सरकारला सतवायला लागला आहे. म्हणून सरकारने उपभोक्तावाद वाढविण्यासाठी आपलेच पैसे बाजारात आणले आहेत. यावर्षी ज्या लोकांना आपल्या खिशातल्या पैशातून चैनीच्या वस्तूंची खरेदी करता येणार नाही त्या लोकांना बँका सढळ हातांनी कर्ज देणार आहेत. बँकांना तसे ते देता यावे यासाठी बँकांकडे पैसा हवा, पण तो पुरेसा नाही. म्हणून सरकारने आपले तिजोरीतले चौदा हजार कोटी रुपये बँकांना नवे भांडवल म्हणून दिले आहेत. आता बँका दिवाळीच्या खरेदीसाठी लोकांना कर्जे देतील, त्या कर्जाचा व्याजदर सुद्धा कमी असेल आणि कर्जासाठी जामीन वगैरे देण्याच्या भानगडी ङ्गार राहणार नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या हंगामात लोक मोठ्या प्रमाणावर मोटारकार, दुचाकी वाहने, कपडे, वॉशिंग मशीन, मिक्सर, कुकर अशा ग्राहकोपयोगी वस्तू, सोने, दागिने यांची खरेदी करतील.
अर्थ व्यवस्था अशा खरेदीला अनुकूल नसली तरीही सरकारने आपले पैसे बाजारात ओतून तिला अशा रितीने अनुकूल केले आहे. हा एक अभूतपूर्व प्रकार आहे निदान भारतात तरी. कारण भारतीय माणूस जसा साध्या राहणीमानाचा पुरस्कर्ता असतो तसा तो भराभर कर्जे सुद्धा काढत नसतो. पण आता सगळ्याच कल्पना बदलून गेल्या आहेत आणि लोक कर्ज काढून राहणीमान वाढवायला लागले आहेत. दरवर्षी हे आकडे वाढत चालले आहेत. यावर्षी ते आणखी वाढतील, अशी अपेक्षा आहे. बँकांकडून कर्जे मिळणार असल्यामुळे लोकांना ही खरेदी आनंदाची वाटेल खरी, परंतु नंतर हप्ते ङ्गेडताना देव आठवतील. पण देव आठवले तरी सध्या ही जीवनपद्धतीच होऊन गेली आहे. आपल्यासारख्या जुन्या लोकांना हे सारे विपरित वाटते, परंतु आजची अर्थव्यवस्था ही अशा भोगवादावरच पूर्णपणे अवलंबून आहे. त्यामुळे भोगवादाला पर्याय नाही. केवळ दुर्दैवाची गोष्ट अशी की भारतात हे कथित चांगले चित्र दिसते किंवा जी संपन्नता दिसते ती संपन्नता एका मर्यादित वर्गापुरतीच आहे. या वर्गालाच ङ्गील गुड क्लास म्हटले जाते. मात्र या देशातला केवळ ३० ते ३५ कोटी एवढाच वर्ग या उपभोक्तावादाचे लाभ घेत आहे. देशातला ङ्गार मोठा वर्ग या सगळ्या सुखचैनीपासून दूर आहे.