पुणे – पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग हा देशातील सर्वाधिक वर्दळ असलेला महामार्ग म्हणून जसा परिचित आहे तसेच दररोज अपघात होणारा महामार्ग अशीही याची ओळख बनली आहे. या द्रुतगती महामार्गावर दररोज किमान १ अपघात होतोच. या सततच्या अपघातांची दखल सरकारने घेतली असून एका स्वयंसेवी संघटनेच्या मदतीने हे अपघात टाळण्यासाठी एक अनोखा प्रयत्न सुरू केला आहे. त्यानुसार या महामार्गाच्या दोन्ही बाजूंना दीड लाख झाडे लावली जाणार आहेत व त्याची देखभाल या महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या ३२ गावातील ३० हजार गावकर्याच्या सहाय्याने केली जाणार आहे.
मुंबईतील फुलोरा फौंडेशनने हे काम हाती घेतले असून संस्थेचे ट्रस्टी अरूण सबनीस या संदर्भात माहिती देताना म्हणाले की, या द्रुतगती महामार्गवर ९३ किमीमध्ये ८५ जागा अशा आहेत की जेथे माणसे, जनावरे व दुचाकीचालक हायवेवर सरळ येऊ शकतात. अपघात टाळायचे असतील तर हे अतिक्रमण अगोदर बंद केले गेले पाहिजे. यासाठी या मार्गाच्या दोन्ही बाजूंना झाडे लावून त्यांचे फेन्सिंग केले जात आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या ३२ गावांत मेणबत्त्या बनविणे व तत्सम कुटिरोद्योग सुरू केले जात असून त्या मालाची विक्री शॉपिग मॉलमधून केली जाणार आहे. यातून मिळणारा पैसा गावकर्याना रोजगार म्हणून दिला जाईल व याच गावकर्याच्या मदतीने महामार्गावर लावलेल्या झाडांची देखभाल व निगराणी ठेवली जाणार आहे.
हा उपक्रम यशस्वी झाला तर महामार्गावरील अपघातांचे प्रमाण लक्षणीयरित्या घटेल असा विश्वासही सबनीस यांनी व्यक्त केला आहे.