जम्मू : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला सीमेपलीकडून पाकिस्तानी फौजांचा गोळीबार सोमवारीपण सुरूच आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये म्हणजेच रविवारपासून पाकिस्तानी सैन्याने आंतरराष्ट्रीय सीमेवरील शस्त्रसंधीचा तब्बल आठ वेळा भंग केला. पाकिस्तानी लष्कराने भारताच्या सीमा सुरक्षा दलाच्या पाच चौक्यांना टारगेट केले आहे. सोमवारी सकाळीही पाकिस्तानी सैन्याने पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला आहे.
पाकिस्तानच्या गोळीबाराने प्रभावित झालेल्या आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भागाचा केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे मंगळवारी दौरा करणार आहेत. त्यापूर्वीही पाकिस्तानी सैन्याच्या कुरापती थांबलेल्या नाहीत. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास आर एस पुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी रेंजर्सनी गोळीबार केला. शनिवारी पाकिस्तानी सैन्यांने बीएसएफच्या १४ चौक्यांवर हल्ला केला होता.
गेल्या दोन महिन्यात पाकिस्तानकडून तब्बल १५० पेक्षा जास्तवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आल्याचं भारतीय लष्कराच्या अधिका-यांनी सांगितले. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ अमेरिका दौ-यावर असताना आणि अध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी चर्चा करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी सैन्याचा गोळीबार वाढला आहे.