नापाक पाककडून चौक्यांवर गोळीबार

जम्मू – भारताच्या प्रत्युत्तरानंतरही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू आणि सांबा सेक्टरमधील 25 चौक्यांवर शुक्रवारी रात्री एकाच वेळी गोळीबार करण्यात आला. त्यामुळे सीमाभागात युद्धसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत. गगन ठाकूर आणि हसदा अशी त्यांची नावे असून दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गेल्या 24 तासांत 5 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबारासोबतच तोफांचाही मारा केला. सांबा सेक्टरमध्ये सुचेतगड गावात पाकिस्तानी तोफा आढळल्या. याच भागात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नांत असलेला एक पाकिस्तानी दहशतवादी मारला गेला आहे. भारतात दिवाळीचा उत्साह असताना पाकिस्तान दुसरे कारगिल घडविण्याच्या प्रयत्नात आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानने घुसखोरीची मोठी योजना तयार केली असून सुमारे 900 दहशतवादी सीमा रेषेपलीकडे भारतात शिरण्यासाठी तयार असल्याची माहिती गुप्तचर खात्याने दिली आहे.

घुसखोरीसाठी पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबाराच्या घटनांमध्येही नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पाकिस्तानकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर 3 दिवसांमध्ये 8 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. आर. एस. पुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैनिकांकडून गुरुवारपासून गोळीबार सुरू आहे. याशिवाय अखनूर येथेही गोळीबारी सुरू आहे. या घटनांमध्ये 3 मुलांसह 5 जण जखमी झाले आहेत. घुसखोरीच्या तयारीत असलेले दहशतवादी प्रशिक्षित आहेत. त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रेही आहेत. बहुतांश दहशतवादी लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या संघटनांचे आहेत. पाकिस्तानने या वर्षी मोठ्या प्रमाणावर शस्त्रसंधी मोडली आहे.

आतापर्यंत 193 वेळा सीमेवर गोळीबार झाला आहे त्या तुलनेत 2012 मध्ये 117 आणि 2011 मध्ये केवळ 61 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले होते. 1999 नंतर प्रथमच नियंत्रण रेषेवर एवढा तणाव वाढला आहे. गुप्त माहितीनुसार 700 दहशतवादी पीर पंजालच्या उत्तरेकडे दबा धरून बसलेले आहेत. तर 150 ते 200 दहशतवादी दक्षिणकेडे आहेत. नीलम घाटी, सोनाम या भागातून भारतात घुसण्याची शक्यता आहे.

Leave a Comment