
मनोहर जोशी यांनी अज्ञातवासात राहून चांगलेच चिंतन केलेले दिसत आहे कारण या अज्ञातवासातून आल्यानंतर त्यांनी आपल्या संबंधातल्या सार्या राजकारणाला नवे वळण दिले आहे. ते मनसेत जातील किंवा राष्ट्रवादीला जवळ करतील असे अनेकांचे समज होते पण सरांनी सर्वांच्या अपेक्षांचा शह देत नवा डाव टाकला. त्यांनी आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामुळे उद्धव ठाकरेंचीच कोंडी झाली आहे. आता पंतांच्या बाबतीत नेमके काय करावे, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना पडलेला आहे. गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय झालेल्या मनोहर जोशी यांच्या संबंधातील राजकारणाला एक वेगळीच कलाटणी मिळाली आहे. पंतांनी बाळासाहेबांच्या कानी लागून बरेच काही राजकारण केले आणि स्वार्थ साधला असे म्हटले जात असले तरी आता उद्धव ठाकरे यांच्या कानी लागून आपला स्वार्थ साधणार्या नव्या पिढीतल्या पंतांना आणि रावांना आता मनोहर जोशींचा काटा नेमका कसा काढावा हा प्रश्न सतवायला लागला आहे. तणावग्रस्त माणसाचा आपल्या बोलण्यावर ताबा नसतो. सरांना आता खासदार होता येणार नाही याचा अंदाज येताच तणाव आला होता आणि तणावामुळे त्यांची वाणी घसरून त्यांची राजकीय घसरगुंडीही वेगवान झाली.
त्यांनी या काळात एका कार्यक्रमात बोलताना, उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व कमकुवत आहे असे सूचित करणारे उद्गार काढले. सरांनी तसे सूचित करणारे वाक्य उच्चारायला नको होते. कारण त्याचे परिणाम चांगले होणार नव्हते. शिवसेनेत नेत्यांना विशेषत: ठाकरे घराण्यातल्या वारसाला सलामच करावा लागतो. शिवसेनेत कॉंग्रेसपेक्षाही वरचढ अशी मुजरा संस्कृती आहे. तेव्हा सर जे काही बोलले ते खरे असले तरी शिवसेनेत असे खरे बोलण्याची परंपरा नाही.पद्धत नाही. सर तर शिवसेनेचे स्थापनेपासूनचे आणि बाळासाहेबांच्या निकटचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांनी शिवसेनेवर एक हजार पानांचा प्रबंध लिहिलेला आहे. मग त्यांना शिवसेनेतली ही पद्धती माहीत नव्हती असे कसे म्हणता येईल? तरीही त्यांनी उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांच्या तुलनेत कमी कणखर ठरवले. त्यांना सारा रितीरिवाज सोडून अशी तुलना करावी वाटली कारण त्यांच्या मनात तसाच विचार होता. नकळतपणे तो त्यांच्या तोंडून बाहेर पडला. शिवसेनेत अशी टीका का चालू नये ? उद्धव ठाकरे हे काही देव नाहीत. मग त्यांच्यात काही दोष असतील आणि ते असे सूचकपणे, अप्रत्यक्षपणे कोणी दाखवून दिले म्हणून त्यांनी चिडण्याचे कारण काय ?
पण असा सवालही विचारण्याची सोय नाही. ते तर नाराज झालेच पण शिवसैनिकही चिडले. शिवसैनिक चिडले की वाट्टेल ते करतात. त्यांनी दसरा मेळाव्यात मनोहर जोशी चले जावच्या घोषणा केल्या. सर सभेतून निघून गेले. चिडलेले शिवसैनिक कदाचित सरांच्या घरावर हल्ला वगैरे करतील म्हणून घरावर पहारा बसवण्यात आला. या वातावरणात सर अज्ञातावासात गेले आणि तीन दिवसांच्या या विजनवासातून परत येऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. त्यात त्यांनी आपण आजन्म शिवसैनिकच राहू असे म्हटले. पण त्यांनी उद्धवसह कोणाचीही क्षमा मागितली नाही. सर रागात काही तरी पाऊल उचलतील आणि त्यांना शिस्तभंगाचे कारण दाखवून पक्षातून काढून टाकता येईल असे शिवसेनेच्या नेत्यांना वाटत होते पण सरांनी तशी संधीच दिली नाही. आता सरांनी शिवसेनेत राहून म्हणजे आतच मुक्काम ठोकून शिवसेनेला इमोशनल ब्लॅकमेलिंग करायचे असे ठरवले असावे. उद्धव ठाकरे या प्रकाराने निराश झाले आहेत. त्यांना नेमके काय आणि कसे करावे याचा काही बोध होत नाही. यापुढे सर शिवसेनेला झोंबतील अशी काही विधाने करीत राहणार आणि ते करताना शब्द प्रयोग तरी असा करणार की त्यावरून त्यांच्यावर कसलीच कारवाई करता येऊ नये.
शिवसेनेला काही मनोहर जोेशी हा एकच विषय नाही. अनेक विषय आहेत पण येत्या काही दिवसांत तरी ठाकरे यांना मनोहर जोशी ही गलेकी हड्डी होऊन बसणार आहे. धड पक्षातून काढूनही टाकता येत नाही आणि पक्षातही नीट रहात नाहीत अशी अवस्था होऊन बसेल. एखाद्या माणसाला उतरती कळा लागली की, लोक त्याला काहीही बोलायला लागतात. त्या न्यायाने गेले दोन दिवस मनोहर जोशी यांच्यावर भुजबळ, राणे यांनी वाट्टेल ते आरोप केले होते. जोशी यांनी त्यांना काही उत्तरही दिले नाही. त्यामुळे लोकच विचार करायला लागले की, पंतांनी स्वार्थ साधला हे खरे आहे, पण राणे आणि भुजबळ यांनी तरी दुसरे काय केलेले आहे. ङ्गरक एवढाच की, पंतांनी शिवसेनेत राहून स्वार्थ साधला. याबाबतीत पंत राणे आणि भुजबळ यांच्यावर मात करून गेले. त्यामुळे या दोघांनी शिवसेना सोडून आपला स्वार्थ साधला. आता नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला आणि भुजबळ यांनी नासिक जिल्ह्याला आपली जहागीर बनवले आहे. अशा लोकांना सरांच्यावर टीका करण्याचा अधिकारच नाही. त्या टीकेमुळे राणे-भुजबळच उघडे पडले आणि आता सरांनी मोठ्या हुशारीने सगळ्या घटनांना वेगळे वळण दिले आहे.