केरन सेक्टरमधील लष्करी कारवाईबाबत संशय!

श्रीनगर – जम्मू- काश्मिरातील केरन सेक्टरमधील लष्करी कारवाई संपुष्टात येऊन 15 दिवस उलटले, तरीही या कारवाईबद्दल संशय कायम आहे. घुसखोरीनंतर सलग 15 दिवस या भागात चकमक सुरू राहिली. तरीही त्यावेळी नेमका काय प्रकार घडला होता, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

या घुसखोरीमागे पाकिस्तानच्या विशेष दलाचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केरन सेक्टरमधील लष्कराची कारवाई 8 ऑक्टोबर रोजीच संपली असल्याचे अधिकृत सांगितले होते. मात्र, त्यानंतरही पाच दिवस ही कारवाई सुरू राहिली. जोपर्यंत सीमा सुरक्षा दलाचे जवान (बीएसएफ) आणि लष्कराचे संयुक्त पथक शालबाटू येथील तीन सीमावर्ती भागातील चौक्यांपर्यंत पोहोचले नव्हते, तोपर्यंत ही चकमक सुरू होती.

शालबाटू हे गाव जम्मू-काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये विभागले आहे. हे गाव 1990 च्या दशकाच्या प्रारंभी घुसखोरीसाठी प्रमुख मार्गांपैकी एक होते. याच भागात लष्करी कारवाई संपल्यानंतरही पाच दिवस घुसखोर आणि लष्करी जवानांमध्ये चकमक सुरू होती. यासंबंधी केंद्र आणि राज्याच्या गुप्तचर संस्थांनी सादर केलेल्या अहवालात केरन सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीतील अनेक त्रुटींवर बोट ठेवण्यात आले.

विशेषतः लष्कराने केलेल्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र, भारतीय लष्कराने केरन सेक्टरमधील कारवाईवर व्यक्त करण्यात येत असलेल्या सर्व शंका फेटाळून लावल्या आहेत आणि तिथे तैनात असलेल्या जवानांचे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर वर्चस्व होते आणि जवानही तैनात केलेल्या चौक्यांवर सातत्याने ये-जा करीत होते, असा दावा केला आहे.

शालाबाटू गावापासून दूर असलेल्या तीन ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये आठ अतिरेकी ठार झाल्याचा दावा लष्कराच्या स्थानिक युनिटने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. या एफआयआरमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी हे अतिरेकी मारले गेले. हे ठिकाण शालबाटूपासून दूर आहे, असे म्हटले आहे. या दाव्यावरही अहवालात शंका उपस्थित करण्यात आली.

या भागातील खोकरी, कुलारी आणि मांगेरता या तीन चौक्यांवर बीएसएफ आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने गेल्या शनिवारी कब्जा मिळविला होता. परंतु, ई-मेलच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना लष्करी मुख्यालयाने याचा इन्कार केला आणि नियंत्रण रेषेवर तैनात केलेल्या जवानांचे या भागावर वर्चस्व होते आणि या भागात तैनात सैनिक चौक्यांवर जा-ये करीत होते, असे सांगितले.

केरन सेक्टरमध्ये कारवाई सुरू असताना 8 ऑक्टोबर रोजी मोहीम संपुष्टात आल्याची घोषणा करण्यामागे काय अगतिकता होती, याबाबत उधमपूरमधील लष्करी अधिकार्‍यांना माहितीही दली नसावी, अशीही शक्यता नाकारता येत नाही. याबरोबरच कुपवाडा सेक्टरमधील प्रभारी मेजर जनरल यांनी मागील काही दिवसांपूर्वी केलेला चकमकीचा दावाही चुकीचा असावा, असा संशय आहे. कारण त्या कारवाईत एकही अतिरेकी पकडला किंवा मारला गेला गेला नाही.

Leave a Comment