
जगी हा खास वेड्यांचा पसारा मांडला सारा. कुणाला वेड कनकाचे, कुणाला कामिनीकांचे. या जगात बायांसाठी आणि सोन्यासाठी वेडे होणारांना काही तोटा नाही. पण आपल्या देशात सध्या एक साधू बायांच्या वेडापायी जेलमध्ये पडला आहे तर एका साधूला सोन्याचे स्वप्न पडले आहे. भारतीयांना सोन्याचे वेड आहे पण त्या वेडाने संन्याशांना आणि साधूंनाही सोडलेले नाही. ज्यांनी निष्कांचन अवस्थेत राहून जगाला निर्मोहीपणाचा उपदेश केला पाहिजे त्यांनाही सोन्याने वेड लावले आहे. सत्य साई बाबांनी आणि अन्यही अनेक साधूंनी सोन्याचा संचय केला आहे. धन्य आहेत ते साधू आणि धन्य आहे त्यांची ती सुवर्णेषणा. आता आता तर सार्या जगाने भारतीयांची चेष्टा केलेला उन्नावचा सोन्याचा साठा सापडलालच नाही. उन्नाव येथील किल्ल्यात ज्या ठिकाणी १ हजार टन सोने लपवून ठेवल्याचे सांगितले जात होते. तिथे सोन्याचा साठा नाही हे उघड झाले आहे. लोक समजत होते तसा तो सहजासहजी हातात आलेला नाही हे तर नक्कीच उघड झाले आहे. त्यामुळे तिथली गर्दी पांगली आहे. मात्र या चार दिवसात आपल्या भारतीय लोकांच्या वृत्ती प्रवृत्तीवर ङ्गार झगझगीत प्रकाश पडला आहे. सोन्याचे हे रामायण अखेर असङ्गल संपूर्ण झाले आहे.
आपल्या जीवनात रामायण या शब्दाला एक वेगळा अर्थ आहे. आपल्या जीवनात एखादी गुंतागुंतीची आणि गंमतीशीर घटना घडली की आपण म्हणतो ते एक रामायण होते. प्रत्यक्षातले रामायण मात्र का घडले आहे याची आपल्याला आठवण नसते. राम आणि सीता हे वनवासाला गेले असताना सीतेला एक हरिण दिसला. त्याच्या अंगावर सोनेरी ठिपके होते. त्या सोनेरी ठिपक्यांचा सीतेला मोह झाला आणि तिने रामाकडे तो हरिण मारून आणण्याचा हट्ट धरला. त्यामुळे रामायण घडले. आपल्या देशातल्या लोकांना सोन्याचा हव्यास कधीपासून आहे यावर या गोष्टीने प्रकाश पडतो. भारतीय लोक सोन्यासाठी हावरे असतात. त्यांना आणखी एका गोष्टीचे अनाठायी आकर्षण असते ती गोष्ट म्हणजे गुप्त धन. कोणीतरी कधीतरी पुरून ठेवलेले धन किंवा सोने आपल्याला प्राप्त होणार आहे म्हटले की, आपले डोळे चमकायला लागतात. अशा धनापायी अनेकदा मनुष्यबळी दिले जातात. मूर्खासारखे खोदकाम केले जाते. आता तर उत्तर प्रदेशात पुरून ठेवलेले धन आणि सोने या दोन गोष्टी एकत्र आल्या आणि या निमित्ताने खोदकाम सुरू होताच लोकांच्या झुंडी ते पहायला आणि हाती लागले तर किलोभर सोने घरी न्यायला म्हणून जमा झाल्या.
खरे तर या ठिकाणी म्हणजे उन्नाव या गावच्या किल्ल्यात जमिनीच्या आत कसला तरी धातू पुरलेला असावा असे पुरातत्त्व खात्याच्या अधिकार्यांना लक्षात आले होते. म्हणून त्यांनी तिथे खोदकाम सुरू करण्याचा निर्णय घेतला. हा धातू म्हणजे सोनेच आहे आणि ते १० हजार किलो आहे असे काही त्यांना आढळले नव्हते. त्यांनी गुपचुप खोदकाम सुरू केले असते तर लोकांना कळलेही नसते आणि ते बघायला लोकांच्या झुुुुंडीही आल्या नसत्या. पण नेमक्या याच वेळी एका रिकामटेकड्या साधूने या किल्ल्यात १००० टन सोने पुरून ठेवले असल्याचा साक्षात्कार आपल्याला झाला असल्याची आवई ठोकून दिली. पुरातत्त्व खात्याची पंचाईत झाली. कारण त्यांचे उत्खनन होणारच होते. पण नेमके याचवेळी या साधूने ही अङ्गवा पसरवली.परिणामी पुरातत्व खात्याने साधूच्या साक्षात्कारावर विसंबून खोदकाम सुरू केले अशा आरोप या खात्यावर करण्यात आला. खरे तर हे खोदकाम सुरू असताना सोने सापडलेच तर त्यातले काही सोने तिथे जमलेल्या बघ्यांना वाटले जाणार नव्हते पण आपल्या देशातले लोक इतके बेजबाबदार आणि बेशिस्त आहेत की त्यांनी जणू काही आपल्याला तिथले सोने मिळणारच आहे असे समजून तिथे गर्दी केली. जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात असा विचित्र प्रकार घडत नसेल.
आता विचार करण्याची एक गोष्ट आहे की, त्या साधूला एक हजार टन सोने पुरले असल्याचा साक्षात्कार आताच का झाला ? तो म्हणतो की, हे धन दीडशे वर्षांपूर्वी पुरून ठेवलेले आहे. ते जर एवढे जुने असेल तर हे टनाचे माप तेव्हा कोठे होते ? भारतात दीडशे वर्षांपूर्वी टन हे मापच नव्हते. ते आपण १९५७ साली स्वीकारले आहे. आपण दशमान पद्धती स्वीकारली असूनही ङ्गळे खरेदी करताना डझनाच्या भावात खरेदी करतो. आपल्या मनावर जुन्या मापांचा अजूनही प्रभाव आहे. मग जुन्या काळात अस्तित्वात नसलेल्या मापात या महाराजांना साक्षात्कार कसा झाला? विशेष म्हणजे सोने जपून ठेवणार्याचा आणि महाराजांचा काहीही संबंध नाही. मग हा साक्षात्कार या महाराजालाच होण्याचे कारण काय? अर्थात असे प्रश्न गर्दीच्या मनात निर्माण होत नाहीत. मात्र लोकांना वस्तुस्थिती कळली तेव्हा त्यांचा भ्रमनिरास झाला आणि आता या ठिकाणी जमलेला जमाव कमी झाला आहे. लोकांच्या मनात गुप्त धन आणि सोने या दोन्ही गोष्टींविषयी किती विकृत आकर्षण आहे याचे दर्शन आपल्याला घडले. प्रत्यक्षात आपल्या सोन्याच्या या भुकेने आपल्या जीवनामध्ये आणि विशेषतः देशाच्या अर्थ व्यवस्थेमध्ये अनेक संकटे उभी केली आहेत. तरीही आपली सोन्याची भूक शमत नाही.