कसाबची केली होती दीड लाखात विक्री !

नवी दिल्ली – मुंबईत 26/11 ला झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील एकमेव जिवंत सापडलेला अतिरेकी अजमल कसाब याला गरिबीमुळे त्याच्या आईने दीड लाख रुपयाला लष्कर- ए- तोयबाच्या अतिरेक्याकडे विकले होते, असा गौप्यस्फोट पाकिस्तानची प्रख्यात लेखिका आणि पत्रकार जुगनू मोहसिन यांनी केला आहे.

मोहसिन नुकतीच खुशवंतसिंह लिटरेरी फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीत आली होती. त्यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला. माझे गाव कसाबच्या गावापासून अवघ्या 10 किलो मीटर अंतरावर आहे. 26 नोव्हेंबर 2008 रोजी जेव्हा मुंबईत अतिरेकी हल्ला झाला, त्यावेळी मी दिल्लीतच होते.

त्यावेळी कसाबची खरी माहिती जाणून घेण्यासाठी आपण एका प्रतिनिधीला फरीदकोट येथे पाठविले होते. तो परतल्यानंतर त्याने सांगितले की, कसाबची आई नुरी लाई रडत होती आणि पैशाच्या बदल्यात आपण कसाबची विक्री करून फार मोठी चूक केली असे म्हणत होती.

विशेष म्हणजे कसाबनेदेखील चौकशीदरम्यान आपण केवळ पैशांसाठी अतिरेकी संघटनेशी जोडलो गेलो होतो, असे म्हटले होते. मुंबई हल्ल्यानंतर कसाबच्या आई- वडिलांनी फरीदकोट सोडले असून, अद्याप ते परतले नाहीत, असेही मोहसिन यांनी सांगितले.

Leave a Comment