मन:शांतीसाठी डार्क चॉकलेट

सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मनाला शांती कशी मिळावी, या प्रश्‍नाने सर्वजण त्रस्त झालेले आहेत. प्रार्थना, योग, ध्यानधारणा असे अनेक उपाय करून लोकांना शांती मिळत नाही. पण आता संशोधकांनी मन:शांतीसाठी एक सोपा उपाय सांगितला आहे. डार्क चॉकलेटचा एक तुकडा तोंडात टाका आणि तो चघळत रहा, त्यातून तुम्हाला मन:शांती मिळेल, चित्तवृत्ती शांत होतील, असे या संशोधकांचे म्हणणे आहे. कारण त्यांना एका संशोधनाने तसे आढळले आहे.

डार्क चॉकलेटमध्ये पॉलिङ्गेनॉल्स हा घटक आहे आणि त्या घटकामुळे माणसाला अति उत्तेजित करणार्‍या हार्मोन्सवर नियंत्रण येते. हे हार्मोन्स माणसाला अस्वस्थ, अशांत आणि चिडचिडे करत असतात. पण त्यांची पॉलिङ्गेनॉल्सशी रासायनिक प्रक्रिया होऊन ते मर्यादेत राहतात. परिणामी माणूस शांत होतो. एवढेच नव्हे तर माणसाचा तणाव सुद्धा कमी होतो आणि तणावातून निर्माण होणार्‍या अनेक विकारांवर नियंत्रण येते. बर्‍याच दिवसांपासून चॉकलेटविषयी संशोधन सुरू आहे.

माणूस खूष झाला की, चॉकलेट देतो आणि चॉकलेट खाणारा खूष होतो. असे बर्‍याच दिवसांपासून आढळलेले आहे. पण असे नेमके का होते, हे समजत नव्हते. एखादे लहान मूल रडायला लागले की, त्याला चॉकलेट देतात आणि चॉकलेट खाल्ले की ते मूल हसायला लागते. खरे म्हणजे चॉकलेटचा हा परिणाम लहान मुलांपुरताच मर्यादित नाही तर तो मोठ्या माणसांवर सुद्धा होत असतो, असे आढळले आहे. पॉलिङ्गेनॉल हे माणसाच्या आहारातील सर्वाधिक आधारभूत अशा घटकांपैकी एक आहे. त्यामुळे त्याचा मानसिक परिणाम होतो. ऑस्ट्रेलियातील स्विनबर्न युनिव्हर्सिटी ऑङ्ग टेक्नॉलॉजी या विद्यापीठातील मॅथ्यू पेस या संशोधकाने चॉकलेट खाल्ले की माणूस का हसतो, या प्रश्‍नाच्या अनुरोधाने संशोधन करायला सुरुवात केली आणि त्याला हे उत्तर सापडले.

४० ते ६५ वर्षे वयोगटातील सुमारे ७२ लोकांवर मॅथ्यू पेसने चॉकलेटचा प्रयोग केला आणि चॉकलेट खाल्ल्याने आणि न खाल्ल्याने निर्माण होणार्‍या त्यांच्या मन:स्थितीचा अभ्यास केला. तेव्हा त्याला माणसाच्या तणावमुक्तीचा चॉकलेट सेवन हा सर्वात सोपा उपाय आहे हे लक्षात आले. आता आपणही रोज एखादे चॉकलेट खाऊन उदासीनतेला दूर करू या.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment