आइनस्टाइनच्या पत्रांना विक्रमी किमतीची अपेक्षा

वॉशिग्टन- प्रख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांनी 1938मध्ये अमेरिकेमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांला लिहिलेल्या दोन पत्रांचा विक्रमी किमतीत लिलाव होण्याची शक्यता आहे. यातील एका पत्रात तर त्यांनी त्यांच्या गणितात फेरफार केल्याची माहिती दिली होती. या पत्रांना लिलावात जवळपास अडीच कोटी रुपये इतकी किंमत मिळण्याची शक्यता आहे.

1938मध्ये आइनस्टाइन यांनी हे पत्र हर्बर्ट सॅल्झर नावाच्या विद्यार्थ्यांला लिहिले होते. आइनस्टाइन यांच्या डिस्टंट पॅराललिझम फिल्ड थिअरी’ संदर्भात कोलंबिया विद्यापीठात 1938 मध्ये शिक्षण घेत असलेल्या हर्बर्ट सॅल्झर या त्यांच्या विद्यार्थ्यांने त्यांना काही प्रश्न पत्र लिहून विचारले होते. या पत्राला आइनस्टाइन यांनी उत्तर देताना हा सिद्धांत गुरुत्वाकर्षण आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्षेत्राशी संबंधित असून, त्या संदर्भातील संशोधन हे काही गणितीय कारणांमुळे थांबले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतर दोन आठवडयांनंतर आइनस्टाइन यांनी पाठवलेल्या दुस-या पत्रामध्ये त्यांनी आपली चूक मान्य केली होती.

सॅल्झरने पाठवलेली गणितीय मांडणी अचूक असल्याचे आइनस्टाइन यांनी म्हटले होते. आइनस्टाइन यांनी त्यांच्या या हुशार विद्यार्थ्यांला पाठवलेली दोन्ही पत्रे न्यूयॉर्क येथील गर्नसेज लिलावगृहात सात नोव्हेंबर रोजी लिलावासाठी ठेवण्यात येणार आहे. या पत्रांना जवळपास अडीच कोटी रुपये किंमत मिळण्याची शक्यता न्यूयॉर्क पोस्टने व्यक्त केली आहे. सॅल्झर हे नंतर एक जगप्रसिद्ध गणितज्ञ बनले. सॅल्झर यांचे 2006मध्ये निधन झाले.