धोनीच्या करणीवर इशांतचे पाणी

मोहाली – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी झालेल्या परिस्थितीत भारतीय संघाने तिसरा सामना खेचून घेण्यासाठी ३०३ धावांचा डोंगर रचला. महेंद्रसिंग धोनी याने कर्णधाराला साजेसा खेळ करीत नाबाद १३९ धावा ठोकल्या. मोहालीचा सामना खिशात टाकून २ विरुद्ध १ अशी आघाडी मिळवण्याचे स्वप्न हातातोंडाशी आले असतानाच इशांत शर्माच्या ४८ व्या महागड्या षटकाने सामन्याचे चित्र बदलले आणि भारताला सामना ४ विकेटने गमवावा लागला.

मोहालीच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जॉर्ज बेली याने नाणेङ्गेक जिंकली आणि गोलंदाजी घेतली. मोहालीची खेळपट्टी ङ्गलंदाजाला अनुकूल असते पण तरीही भारताची घसरगुंडी सुरू झाली. ४ बाद ७६ अशी अवस्था आली. पण धोनी आणि विराट कोहली यांनी पाचव्या विकेटसाठी ७२ धावांची भागिदारी करून भारताला ५ बाद १४८ या स्थितीत आणून ठेवले. नंतर मात्र विराट कोहलीच्या ७३ धावा (९ चौकार) आणि धोनीच्या १३९ धावा (१२ चौकार, ५ षटकार) याने सामन्याचे चित्रच बदलून गेले. धोनीने शेवटपर्यंत खेळून ३०३ धावांचा डोंगर उभा केलाच, पण पाहुण्या संघासमोर ओलांडता येणार नाही असे आव्हान ठेवले.

आत्मविश्‍वास गमावलेल्या अवस्थेत ऑस्ट्रेलिया संघ खेळायला आला आणि ४७ व्या षटकापर्यंत ऑस्ट्रेलिया हरणार अशीच अवस्था निर्माण झाली. ४८ वे षटक टाकायला इशांत शर्मा आला पण फ्युकनरने त्याची गोलंदाजी ङ्गोडून काढत त्या एका षटकात ३० धावा टोलवल्या. ऍडम वोग्स् (नाबाद ७६) आणि फ्युकनरच्या नाबाद ६४ धावांनी ऑस्ट्रेलियाची बाजू सावरली. विजयाचे पारडे ऑस्ट्रेलियाकडे झुकविणार्‍या ४८ व्या म्हणजेच इशांत शर्माच्या आठव्या षटकात फ्युकनरने १ चौकार, ४ षटकार ठोकत ३० धावा मिळविल्या. २९ चेंडूत ६ षटकार आणि २ चौकारांसह ६४ धावा टोलवणारा फ्युकनर हा ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. ऑस्ट्रेलियाने मॅच ४ विकेटने जिंकली आणि मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. आता सर्वांचे डोळे २३ ऑक्टोबरला होणार्‍या चौथ्या एकदिवसीय सामन्याकडे लागले आहे.

Leave a Comment