चंदनाची उटी शीतल

चंदनाचा वापर आपल्या देशात परंपरेने चालत आला आहे. उन्हाळ्यात चैत्रा गौरीच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात सुहासिनींच्या हाताला चंदनाची उटी लावली जाते. उन्हाळ्यातला हा उपचार उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी असतो. सौंदर्य प्रसाधन आणि औषध म्हणून चंदनाचा आपल्या समाजात होत असलेला वापर यातून अधोरेखित होत असतो. चंदनाचा उपयोग त्वचेला तजेला आणण्यासाठी चांगलाच होत असतो. चंदन आपल्याला दोन स्वरूपात सहजतेने प्राप्तही होते. बाजारात चंदनाची पावडर मिळते, चंदनाचे तेलही मिळते आणि चंदनाच्या खोडाचा म्हणजे लाकडाचा तुकडाही मिळतो.

उन्हाचा आणि वार्‍याचा परिणाम होऊन त्वचा खराब झालेली असते. काळी होते. तेव्हा चंदन आणि हळद यांचे मिश्रण करावे, त्यात थोडे पाणी मिसळून त्याचा लेप चेहर्‍यावर चढवावा, तो २० मिनिटे ठेवावा. नंतर धुऊन टाकावा. ही त्वचा तजेलदार होते. या मिश्रणाने चेहर्‍यावरच्या तारुण्यपीटिकाही कमी होतात आणि त्यांच्यामुळे पडणारे डागही निघून जाऊन त्वचा निर्मळ होते. त्वचा कोरडी असणारांनी चंदनाचा केवळ पाण्यात कालवून तयार झालेला लेप लावावा. चेहर्‍यावरची त्वचा मऊ आणि स्निग्ध होते. चंदन, बदामाच्या बियांचे पावडर आणि दूध यांच्या मिश्रणानेही त्वचेचा दिमाख वाढतो. हे मिश्रण दररोच चेहरा, हात आणि पायांनाही लावायला हरकत नाही.

चंदनाचा सर्वांग परिपूर्ण पॅक तयार करायचा असेल तर चंदनाची पावडर, हळद, साय, मध, गुलाब पाणी, बेसन यांचे मिश्रण करावे. ते आठवड्यातून एकदा चेहर्‍यावर लावावे. त्यामुळे त्वचा नितळ तर होतेच पण ती कसल्याही प्रकारच्या जंतु संसर्गापासूनही मुक्त होते. हे मिश्रण म्हणजे भारतीय तसेच रसायनांपासून मुक्त अशा सौंदर्य प्रसाधनाचा उत्कृष्ट नमुना आहे. चंदनाची पावडर तांदळाच्या पिठात मिसळून हे मिश्रण गुलाब पाण्यात मिसळले तरीही त्याने त्वचा तुकतुकीत होते.

केवळ चंदनाच्या पावडरचा पाण्यात कालवलेला लेप अंगाला लावल्यास उन्हाळ्याच्या त्रासापासून दिलासा मिळतो. चंदनाची पावडर मिळत नसल्यास बाजारात उपलब्ध असणारी चंदनाची लोशन्स आणि साबणेही आपल्याला चंदनाचा ङ्गायदा मिळवून देतात पण शेवटी मूळ रूपातले चंदनच अधिक गुणकारी असते.