समाजाच्या मानसिकतेचे प्रतिबिंब…वंशवेल

समाजाचे प्रतिबिंब म्हणून चित्रपट माध्यमाकडे पाहिले जाते. याचे भान ठेवून सामाजिक विषयावरील चित्रपटांना योग्य तो न्याय देण्याची हातोटी मोजक्या दिग्दर्शकांना आहे. त्यामध्ये अग्रगण्य नाव म्हणजे दिग्दर्शक राजीव पाटील! त्यांनी सावरखेड एक गांव, जोगवा, पांगिरा असे चित्रपट दिले आहेत. वंशवेल हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीनुसार स्त्री-भ्रूण हत्या या सामाजिक विषयावर यात भाष्य केले आहे.

वंशवेल ही कथा आहे दादासाहेब (किशोर कदम) आणि माई (विद्या करंजीकर) यांच्या कुटुंबाची. दादासाहेब हे गावातले बडे प्रस्थ. सत्ता आणि त्या माध्यमातून सामाजिक सेवा व जोडीला सुसज्ज हॉस्पिटल, शेकडो एकर शेती हे दादासाहेबांचे वैभव. नीलेश (सुशांत शेलार) आणि अनिल (शंतनु गंगणे) ही दादासाहेबांची दोन मुले. नीलेश स्त्रीरोगतज्ज्ञ, तर अनिल शेतीकडे लक्ष देणारा. घरात आणि गावात दादासाहेबांच्या हुकमाशिवाय पानही हलत नाही.

नीलेशची पत्नी प्रियंका (मनीषा केळकर) गरोदर आहे. तिला मुलगी होणार हे सिद्ध होऊन नाट्याला सुरुवात होते. त्यातच अनिलचे लग्न होते. त्याची पत्नी सायली (नम्रता गायकवाड) ही स्त्रीरोगतज्ज्ञ. दादासाहेबांना मुलगाच हवा असतो, तर प्रियंकाला मात्र मुलगी. त्यातूनच पुढे या कुटुंबातील तणाव वाढतो आणि प्रियंका आत्महत्या (?) करते. दरम्यान, दादासाहेबांचे हॉस्पिटल म्हणजे लिंगनिदान आणि स्त्री भ्रूणहत्येचा अड्डा असल्याचे सायलीच्या लक्षात येते. त्यातून ती नवर्‍याच्या मदतीने हे सर्व बंद करण्याची योजना आखते. प्रियंकाच्या आत्महत्येची चौकशी सुरू होते. चौकशीसाठी आलेला पोलिस इन्स्पेक्टर विक्रम राजे (अंकुश चौधरी) दादासाहेबांचे सर्व काळे धंदे उघड करतो. एके दिवशी अचानक प्रियंका आपल्या लहान मुलीसह अवतरते. त्यातच कुटुंबातील अनेकांना घरात लहान मुलांचे भूत दिसते, अशी ही रंजक कथा मोठ्या पडद्यावर पाहायलाच हवी.

राजीव पाटील यांच्या दिग्दर्शनाची जादू ‘वंशवेल’मध्येही कायम आहे. चित्रपटाची पटकथा पाटील यांचीच आहे. दत्ता पाटील यांचे संवाद. अतिशय चपखल आणि थेट समाजातील या व्यंगावर परखडपणे भाष्य करणारे आहेत. एका कुटुंबात मुलगी येणार म्हणून निर्माण झालेला कलह एवढीच मूळ कथा असल्याने चित्रपट त पटकथालेखकांना बरीच कसरत करावी लागते. त्यात मुद्दाम नाट्यमय घडामोडी निर्माण करण्यात आल्या आहेत. यामुळे चित्रपट थोडासा लांबल्याचे जाणवते. स्त्रीभ्रूणहत्येबाबतच्या समाजातल्या ज्या मानसिकतेचं प्रतिनिधित्व दादासाहेब करतात, त्यावर घरातील वादाचा काही परिणाम होत नाही. उलट त्यांचं परिवर्तन होतं ते एकटेपणामुळे आणि त्या एकटेपणात झालेल्या अत्यंत व्यक्तिगत साक्षात्कारामुळे. त्यामुळे देशमुख कुटुंबावर गुदरलेल्या प्रसंगांना काही अर्थ उरत नाही.

सत्तेचा माज आलेला निष्ठुर दादासाहेब किशोर कदम यांनी जबरदस्त उभा केला आहे. सुशांत शेलारने दादासाहेबांच्या धाकात वाढलेला डॉक्टर आणि प्रियंकाचा भावुक पती या दोन्ही शेड्स चांगल्या वठवल्या आहेत. जाहिरात विश्‍वातून आलेल्या मनीषा केळकरचा चित्रपटातील वावर ग्रेसफुल. शंतनु गंगणेच्या वाट्याला दमदार व्यक्तिरेखा असूनही त्याचा फारसा प्रभाव पडत नाही. त्या मानाने नम्रता गायकवाड उत्तम काम करते. खरी मजा आणतो तो अंकुश चौधरी. किशोर कदम आणि अंकुशच्या अभिनयाची जुगलबंदी पाहण्यासारखी आहे.

सौमित्र आणि दत्ता पाटील यांनी यातील सुंदर गीते लिहिली असून कथेला साजेशी आहेत. गाण्यांचे चित्रीकरणही उत्तम आहे. अमितराज यांचे पार्श्‍वसंगीतही सुंदर आहे. 18 अभिनेत्रींना घेऊन केलेले प्रमोशनल सोंग आदर्श शिंदेच्या आवाजाने लक्षात राहणारे आहे.
स्त्रीभ्रूणहत्या आणि वंशाला दिवा हवा, या सामाजिक समस्येचा अस्वस्थ करणारा अनुभत वंशवेल देतो. पती-पत्नी नाते, कुटुंबव्यवस्था, स्त्री-पुरुष समानता यावर भाष्य करणारा हा चित्रपट आवर्जून पहावा असाच आहे.

निर्मिती : अर्चित फिल्म्स
दिग्दर्शक : राजीव पाटील
संगीत – अमितराज
कलाकार : अंकुश चौधरी, किशोर कदम, सुशांत शेलार, शंतनु गंगणे, मनीषा केळकर, नम्रता गायकवाड, विद्या करंजीकर, उषा नाईक आदी.

रेटिंग * * *

Leave a Comment