रेल्वे ग्रामीण व दुर्गम भागासाठी पुरविणार ब्रॉडबँड सेवा

नवी दिल्ली – रेल टेल हा भारतीय रेल्वेचा टेलिकम्युनिकेशन विभाग रेल वायर या नावाने उच्च क्षमतेची ब्रॉडबँड सेवा देशाच्या ग्रामीण व दुर्गम भागातही सुरू करणार असून ही सेवा सर्वसामान्यांना परवडणार्‍या दरात उपलब्ध करून दिली जाणार आहे. रेल टेलचे व्यवस्थापकीय संचालक बी.के. बहुगुणा यांनी ही माहिती दिली.

बहुगुणा म्हणाले की सध्या कर्नाटक, तमीळनाडू व केरळच्या कांही भागात रेल वायर प्रयोगिक तत्त्वावर ही सेवा देत आहे. सध्या कांही भागापुरतीच मर्यादित असलेल्या या सेवेसाठी ६००० ग्राहक नोंदले गेले आहेत. ब्रॉडबँड, इंटरनेट सेच आय.पी. टेलिफोनी सेवाही या प्रकल्पांत समाविष्ट करण्यात आलेली आहे. त्यासाठी देशभर रेल्वेने ऑप्टीकल फायबर केबल टाकल्या आहेत. सध्या ४२ हजार किलोमीटरचे जाळे पूर्ण झाले असून अन्य ७५०० किमीचे जाळे पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

रेलवायरचे जाळे देशाच्या ग्रामीण आणि दुर्गम भागातही पोहोचले आहे असे सांगून ते म्हणाले की या सेवेमार्फत सध्या ४२०० गांवे, शहरे, खेडी ब्रॉडबँडने जोडली गेली आहेत. प्रकल्प विस्तारात रेल्व स्टेशनवरही प्रवाशांना वायफाय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे असेही बहुगुणा यांनी सांगितले.