‘बॉस’ – अक्षय स्टाईल विनोदी तडका

‘रावडी राठौड’ नंतर अक्षयकुमार पुन्हा एकदा दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘बॉस’ या चित्रपटाच्या माध्यमातून. 2010 साली आलेला मल्याळम चित्रपट ‘पोक्किरी राजा’चा हा रिमेक आहे. ’पोक्किरी राजा’मध्ये ममुटी आणि पृथ्वीराज प्रमुख भूमिकेत होते; तर इथे अक्षयकुमार आणि शिव पंडीत आहेत.

‘बॉस’ ही लहानपणीच घरातून बाहेर पडलेला सूर्या (अक्षयकुमार) ची कथा आहे. शाळेत असताना त्याच्या हातून खून होतो. सूर्या सत्यकांत शास्त्री (मिथुन चक्रवर्ती) या प्रामाणिक, तत्त्वनिष्ठ शिक्षकाचा मुलगा आहे. सुधारगृहातून बाहेर त्याची पुन्हा भांडणे होतात आणि मग सत्यकांत त्याला घराबाहेर काढतात. मग सूर्या ट्रान्सपोर्ट माफिया असलेल्या ताऊजी उर्फ बीग बॉसचा (डॅनी) जीव वाचवतो आणि त्याचा मुलगाच बनतो. हे ताऊजीचं सूर्याचं ‘बॉस’ असं नामकरण करतात. एकीकडे सूर्याचा बॉस होतो; तर दुसरीकडे त्याचा लहान भाऊ शिव ( शिव पंडीत) हा एसीपी आयुष्यमान ठाकूरच्या (रोनित रॉय) बहीण अंकिताच्या ( अदिती राव हैदरी) प्रेमात पडतो. मात्र, आयुष्यमानला आपल्या बहिणीचं लग्न गृहमंत्र्याच्या मुलासोबत करायचे आहे. मग काय एसीपी शिव पंडीतवर खोटा आरोप लावून त्याची रवानगी तुरुंगात करतो. त्याला संपविण्याची सुपारी बॉसला देतो, तोपर्यंत सूर्याला शिव आपला भाऊ असल्याचं माहित नसते. जेव्हा बॉसला हे माहीत होतं. तेव्हा तो शिवला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. त्याबरोबरच बॉस आणि एसीपीच्या युद्धाला सुरुवात होते, अर्थात शेवट काय होणार हे प्रेक्षकांना माहीत असतं आणि तसाच शेवट होतो.

चित्रपटाचे दिग्दर्शन ‘ब्लू’सारखा सुपरप्लॉप चित्रपट देणार्‍या अ‍ॅन्थोने डिसोजाने केले आहे. रिमेक करताना आपल्या स्वातंत्र्याचा पूर्ण उपभोग घेत लेखक साजिद-फरहादनं पूर्णपणे खळबळजनक घटना आणि विनोदी संवाद लिहिले आहेत. हे संवाद म्हणजे पोकळ गर्जनायुक्त भाषण नसून मजेशीर संवाद आहेत. चित्रपटातला प्रत्येक सिक्वेन्स हा नावीन्यपूर्ण आहे. यामुळे चित्रपटाच्या मूळ कथेत नावीन्य नाही, याची जाणीव प्रेक्षकांना होत नाही. चित्रपटाची सुरुवात अत्यंत धीम्या गतीने होते, तसेच अक्षयकुमारची एन्ट्री तब्बल अर्ध्या तासानंतर आहे. तोपर्यंत शिव पंडीत आणि अदिती राव हैदरींची प्रेमकहाणी फुलवली आहे. चित्रपटात अक्षय कुमार हरियाणवी भाषा बोलताना दिसतो. त्याची चित्रपटातली एन्ट्री बॉस या नावाप्रमाणे दमदार व्हायला हवी होती. मात्र, अत्यंत विनोदी ढंगाने त्याची एन्ट्री दाखविली आहे.

अभिनेता रोनित रॉयनं खलनायकाची भूमिका खूप चांगली निभावलीय. अक्षयच्या भावाचा रोल करणारा शिव पंडीत न्यू-कमर असला तरी आपली चांगली छाप सोडून जातो. अक्षयचा हा असा चित्रपट आहे की, त्यात त्याला हिरोईनच नाही. सोनाक्षी सिन्हा त्याच्या सोबत गाण्यापुरती दिसते त्या दोघांवर दोन गाणी चित्रीत करण्यात आलेली आहेत. अदितीकडे अभिनयाच्या नावावर दोन-तीन रोमँटिक गाणे आणि काही बिकिनी सीन्स आहेत. मिथुन चक्रवर्ती यांनी त्यांच्या वाटेला आलेल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. परीक्षित सहानींचा दिग्दर्शकाला उपयोग करून घेता आलेला नाही.
बॉसमध्ये अक्षयची स्टाईल, अँक्शन, गाणी, ट्रक, कार जुनीच आहेत. यामुळे नावीन्याच्या शोधात आलेल्या प्रेक्षकांची निराशा होणे स्वाभाविक आहे. कारण ’राऊडी राठौड’ आणि ’खिलाडी 786’ या धाटणीचाच आहे.चित्रपटामध्ये लक्षात राहण्यासारखं काही आहे तर ते संगीत, गाणी ही भक्कम बाजू आहेत. एकंदरीत मसालायुक्त तडक्यानं बॉस सर्वांचं मनोरंजन करतो.मात्र, चित्रपट पाहायला जाताना तुम्ही फार काही अपेक्षा न करता, केवळ हसण्यासाठी चित्रपट बघायचायं हे लक्षात ठेवा.

चित्रपट – बॉस
निर्मिती -अश्‍विनी यार्दी
दिग्दर्शक – अँथोनी डिसूजा
संगीत -मीत ब्रदर्स अंजन, यो यो हनी सिंग
कलाकार – अक्षय कुमार, मिथुन चक्रवर्ती, शिव पंडीत, अदिती राव हैदरी , डॅनी, जॉनी लीव्हर, परीक्षित साहनी, रोनित रॉय.

रेटिंग – * * *

Leave a Comment