कोल्हापूर खंडपीठासाठी अजमेर एक्सप्रेस रोखली

सांगली – कोल्हापूरला उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे या मागणीसाठी वकील संघटनांनी पुकारलेले आंदोलन पेटले आहे. या मागणीसाठी सांगलीत आज वकील संघटना आणि शिवसेनेने अजमेर एक्सप्रेस रोखून आपला संताप व्यक्त केला. तब्बल 3 मिनिटे सांगली रेल्वे स्थानकावर अजमेर एक्सप्रेस रोखून धरली.

कोल्हापूरला उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे या मागणीसाठी सांगलीसह पाच जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून वकिलांचे विविध मार्गाने आंदोलन सुरु आहे. कधी रास्ता रोको, तर कधी शंखध्वनी करून वकील आपल्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. खंडपीठाची मागणी करीत आज सांगलीतील शेकडो वकिल आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगली रेल्वे स्थानकावर अजमेरला जाणारी गरीबरथ अजमेर एक्स्प्रेस रोखून धरली.

यावेळी शिवसैनिक आणि वकिलांनी रेल्वेच्या इंजिनवर चढून खंडपीठाच्या मागणीच्या जोरदार घोषणा दिल्या. यावेळी आंदोलकांनी रेल्वे समोरच ठिय्या मारला, मात्र पोलिसांनी आंदोलकांना बाजूला करून अजमेर एक्स्प्रेस रवाना केली.