अभिषेकच्या’ सिनेमातून सुशांत बाहेर

काही दिवसांपूर्वी आलेल्या दिगदर्शक अभिषेक कपूरच्या ‘काय पो चे’ या सिनेमामुळे सुशांत सिंग राजपूत हा मोठय़ा पडद्यावर लोकप्रिय झाला. सुशांतला घडवणारा दिग्दर्शक म्हणूनच अभिषेककडे पाहिले जाते. त्यामुळे सुशांतच्या बाबतीत अभिषेक थोडा आग्रही झाला होता. आपल्या ‘फितूर’ या सिनेमासाठी अभिषेकने सुशांतचे नाव निश्चित केले होते. मध्यंतरी, सुशांतने निवडलेल्या सिनेमाबद्दल अभिषेकने नाराजीही व्यक्त केली होती. त्यय’मुळे अखेर सुशांतला ‘फितूर’ हा सिनेमा सोडावा लागला आहे.

‘काय पो चे’मुळे सुशांतला लोकप्रियता मिळाली आहे आणि एकापाठोपाठ एक सिनेमे त्याच्याकडे येत असल्याने त्याला अभिषेकचा सिनेमा करायलाच वेळ नसल्याची चर्चा सुरू झाली होती. या चर्चेला जोर चढताच अभिषेकनेही सुशांतच्या सिनेमा निवडीवर नाराजी व्यक्त केली. पण, सुशांतने मात्र आपण अभिषेकचा सिनेमा सोडलेला नाही आणि काहीही झाले तरी आपण तो सिनेमा करणारच असे जाहीर केले होते.

एवढेच नाही तर सुशांतने या ऑक्टोबरच्या तारखाही चित्रिकरणासाठी दिल्या होत्या. पण, यावेळी अभिषेकचे प्रयत्न कमी पडले. काही कारणांमुळे अभिषेकला ‘फितूर’चे चित्रिकरण मार्च २०१४ पर्यंत आणि मग अगदी जुलैपर्यंत पुढे ढकलावे लागले. सुशांतने पुढच्या वर्षीच्या तारखा शेखर कपूर दिग्दर्शित ‘पानी’ या सिनेमासाठी दिल्या आहेत.