मिलान (इटली) – व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी स्वीस अधिकार्यांनी गिडो राल्फ हॅस्की याला अटक केलीय. त्याच्यावर 3600 कोटी रूपयांच्या व्हीव्हीआयपी ऑगस्टावेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात भारतीय अधिकारी आणि नेत्यांना लाच दिल्याच्या आरोप आहे. गिडो राल्फ हॅस्की याला स्वित्झर्लंडमधील लुगानो येथे अटक करण्यात आल्याचं वृत्त इटालियन प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.
गिडो राल्फ हॅस्की याला इटलीमध्ये घेऊन जाण्यासाठी स्वीस कोर्टाने संमती दिल्याचंही वृत्तसंस्थांच्या बातम्यात सांगण्यात आलंय. तर इटालियन माध्यमांनी प्रसारित केलेल्या वृत्तानुसार गिडो राल्फ हॅस्की यानेच इटलीच्या तपासयंत्रणांनी दाखल केलेल्या हस्तांतरणाला विरोध न करण्याचा निर्णय घेतल्याने पुढील आठवड्यात त्याला इटलीमध्ये नेण्यात येईल. 3600 कोटी रूपयांच्या व्हीव्हीआयपी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टरचा पुरवठा भारताला करण्याच्या व्यवहारात भारतीय अधिकारी आणि नेत्यांना लाच दिल्याचं प्रकरण अलीकडेच उघडकीस आलं होत.
इटालियन आणि भारतीय तपास यंत्रणा या घोटाळ्याचा संयुक्त तपास करत आहेत. या व्यवहारात माजी हवाई दल प्रमुख एसपी त्यागी यांच्यावरील आरोप झाले होते, मात्र त्यांनी आपल्यावरील आरोपाचं खंडन केलं. मात्र सीबीआयच्या आरोपपत्रात एसपी त्यागी यांचाही उल्लेख आहे. आज अटक करण्यात आलेला गिडो हॅस्की या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रातील तेरावा आरोपी आहे. गिडो हॅस्की आणि कार्लो गेरोसा या दोघा दलालांनी हा व्यवहार पूर्ण केला आणि भारतीय अधिकार्यांना दलाली दिल्याचा आरोप आहे.
सीबीआयच्या तपासानुसार या दोघांनी भारतीय अधिकार्यांना 56 लाख युरो लाच दिल्याचा आरोप आहे. लाचेची ही रक्कम मोहाली आणि चंदीगढच्या एका माहिती तंत्रज्ञान कंपनीच्या माध्यमातून देण्यात आल्याचंही सीबीआयच्या तपासात निष्पन्न झालं. भारताला हवी असलेली हेलिकॉप्टर फिनमेकॅनिका ही कंपनी पुरवणार होती. या ब्रिटनमधील ऑगस्ट वेस्टलँड ही कंपनी फिनमेकॅनिकाची उपकंपनी आहे. फिनमेकॅनिकाच्या सीईओंनी गिडो हॅस्की आणि कार्लो गेरोसा या दोघा दलालांना हा व्यवहार पूर्ण करण्याची जबाबदारी दिली होती, असा सीबीआयचा आरोप आहे.