
उरल – रशियामध्ये या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ज्या उल्केच्या आघातामुळे थरकाप उडाला होता त्या उल्केचा तुकडा उरल प्रांतातील एका तलावात सापडल्याचे सांगितले जात आहे. सापडलेला तुकडा अर्धा टन वजनाचा आहे.
उरल – रशियामध्ये या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ज्या उल्केच्या आघातामुळे थरकाप उडाला होता त्या उल्केचा तुकडा उरल प्रांतातील एका तलावात सापडल्याचे सांगितले जात आहे. सापडलेला तुकडा अर्धा टन वजनाचा आहे.
ही उल्का जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात शिरली तेव्हा जोरदार आवाज होऊन त्या हादर्याने 1200लोक जखमी झाले होते. त्या वेळी आकाशातून एखादे क्षेपणास्त्र जावे, तसे आगीचे व धुराचे लोळ काढत ही उल्का आकाशातून निघून गेली होती. ते पाहिल्यावर जणू काही अणुयुद्ध सुरू झाले, असे वाटल्याची माहिती रशियातील उरल प्रांतात राहणार्या लोकांनी दिली होती.
या घटनेनंतर सुमारे आठ महिन्यांनी ही उल्का उरलच्या तलावातून बाहेर काढण्यात आली आहे. त्या वेळी या उल्केचे असंख्य तुकडे झाले होते. यापैकी काही तुकडे तर अगदी नखापेक्षाही छोटे होते. या भागात या सर्व तुकडयांचा शास्त्रज्ञ अजूनही शोध घेत आहेत. यापैकी बरेच तुकडे चेबारकुल नावाच्या या तलावात पडले. या तलावात असलेला या उल्केचा सर्वात मोठा तुकडा बाहेर काढण्याची मोहीम नुकतीच हाती घेण्यात आली.
या मोहिमेचे थेट प्रक्षेपणही टीव्हीवरून दाखवण्यात आले. संशोधकांच्या एका पथकाने सुमारे 1.5 मीटर लांबीचा एक खडक पाण्यातून बाहेर काढला. मात्र, पाण्याबाहेर काढण्यापूर्वीच त्याला एका विशेष प्रकारच्या आवरणात गुंडाळण्यात आले होते. अशा प्रकारे पूर्णपणे आच्छादित स्थितीत त्या खडकाला बाहेर काढण्यात आले. जास्त वजन तोलू शकणा-या वजनकाटयावर त्याला ठेवण्यात आले. मात्र, या खडकाच्या वजनाबाबतचा शास्त्रज्ञांचा अंदाज चुकला.
जेव्हा या खडकाला तरफा लावून वजनकाटयावर ठेवताना त्याचे तुकडे होऊ लागले आणि वजनकाटयावर ठेवल्याबरोबर काटा 570 किलोग्रॅमपर्यंत पोहोचल्यावर तुटला. हा अखंड खडक 600 किलोपेक्षा जास्त वजनाचा असावा, असे एका शास्त्रज्ञाने सांगितले. मात्र, हा खडक म्हणजे अवकाशातून पृथ्वीवर आलेली तीच उल्का आहे, असा निष्कर्ष इतक्यात काढणे योग्य ठरणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.