मुंबई – दसरा मेळाव्यातल्या नाट्यानंतर प्रथमच मनोहर जोशी यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे आपली बाजू मांडली आहे. त्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट न घेता त्यांना पत्र लिहिले आहे. मी आधीही शिवसैनिक होतो, आताही शिवसैनिक आहे आणि यापुढेही शिवसैनिकच राहीन’ असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. तसेच, मी कुठेही चुकलो नाही’ असे या पत्रात त्यांनी आवर्जून नमूद केले आहे.
एका कार्यक्रमात मनोहर जोशी यांनी पक्षनेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर दसरा मेळव्यात कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशींच्या व्यक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. तर, शिवसेना कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजीने आपला व्यक्त केला होता. शिवसैनिकांच्या घोषणाबाजीमुळे मनोहर जोशींना व्यासपीठ सोडून जावे लागले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी आक्रमक शैलीत भाषण केले, पण मनोहर जोशींबाबत घडलेल्या या घटनेचा उल्लेख टाळला.
या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ निर्माण झाली होती. त्यानंतर प्रत्यक्ष भेट न घेता आता उद्धव ठाकरेंना जोशी सरांनी पत्र लिहिल्यामुळे या सा-या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. तसंच उद्धव यावर काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. बाळासाहेबांनंतरचा हा पहिला दसरा मेळावा कसा होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले होते. पण प्रत्यक्षात हा दसरा मेळावा मनोहर जोशी प्रकरणामुळे गाजला. या सर्व प्रकरानंत राजकीय वर्तुळात आता शिवसेना काल, आज आणि उद्या याविषयी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.