जागतिक गुलामगिरी इंडेक्स – भारत अव्वल स्थानावर

गुरूवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पहिल्या ग्लोबल स्लेव्हरी इंडेक्सनुसार भारतात जगातील सर्वाधिक जास्त लोक या ना त्या प्रकारच्या गुलामगिरीचे जिणे जगत असून ही संख्या १ कोटी ४० लाख इतकी आहे. जगात हीच आकडेवारी ३ कोटींवर आहे. याचाच अर्थ जगातील जवळजवळ मिम्मी संख्या एकट्या भारतात आहे.आधुनिक काळातील गुलामगिरीचे आशिया आणि आफ्रिका हे खंड माहेरघर मानले जात असले तरी कोणताच खंड या गुलामगिरीला अपवाद नाही.

ऑस्ट्रेलियातील वॉक फ्री फौंडेशनने केलेल्या या सर्वेक्षणात जगातील १६२ देशात आधुनिक गुलामगिरी संदर्भातली निरीक्षणे नोंदविली गेली. आधुनिक गुलामगिरीमध्ये कर्जाच्या विळख्यात सापडून पिळवणूक होत असलेले नागरिक, जबरदस्तीने विवाह, वेश्या व्यवसायात आणल्या जाणार्‍या महिला, लष्करासाठी लहान मुलांचा होत असलेला वापर अशा बाबींचा समावेश केला गेला आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार जगात या प्रकारच्या गुलामगिरीत जगणार्‍यांची संख्या २.९८ कोटी इतकी असून यूएनच्या म्हणण्यानुसार त्यातील २ कोटी १० लाख लोक मॉरिटॅनिया, हैती, पाक, भारत, नेपाळ, माल्डोव्हा, बेनीन, गाँबिया या देशात आहेत. जगातील एकूण गुलामगिरीत जगणार्‍यांपैकी ७६ टक्के लोक भारत, चीन, पाक, नायजेरिया, इथिओपिया, रशिया, थायलंड, डेकोक्रेटिक रिपब्लीक ऑफ कांगो, म्यानमार व बांग्ला देश अशा १० देशांतील आहेत.

जगात लोकसंख्येत दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या भारतात बालकामगार, औद्योगिक कामगार, व्यावसायिक, लैगिक शोषणाचे शिकार, जबरदस्ती विवाह, कर्ज विळखा, वेठबिगार अशा सर्व क्षेत्रात गुलामगिरी आहे आणि त्यातील बहुसंख्य बांधकाम, टेक्स्टाईल, विटा तयार करणे, खाणकाम अशा ठिकाणी काम करतात. यात महिला, पुरूष व मुले या सर्वांचा समावेश आहे. म.गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेसारख्या योजना अशी गुलामगिरी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात असेही निरीक्षण या सर्वेक्षणात नोंदविले गेले आहे.