कॉंग्रेसला हवे आहे गांधी घराणे

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कॉंग्रेस पक्षाने महात्मा गांधींचा पुण्याईचा वापर करून सत्ता हस्तगत केली. महात्मा गांधींनी सांगितलेल्या तत्वांना हरताळ ङ्गासूनसुध्दा त्यांनी गांधींच्या नावाचा जप केला आणि लोकांच्या मनात असलेला गांधीजीविषयीचा आदर सरळ सरळ आपल्या स्वार्थासाठी वापरला. आता कॉंग्रेसजनांना महात्मा गांधींचा विसर पडला आहे. कारण इंदिरा गांधी यांनी गांधी घराण्याची सत्ता प्रस्थापित केली आहे. आता गांधी-नेहरू घराण्याच्या कथित पुण्याईच्या जोरावर कॉंग्रेसचे नेते सत्तेची ङ्गळे चाखत आहेत. त्यात त्यांचा पूर्ण स्वार्थ आहे. कारण ही मंडळी सत्तेला हपापलेली आहेत. ज्याचे नाव घेतल्याने सत्ता मिळेल तो आपला नेता. असा सरळ सरळ व्यापारी हिशोब त्यांनी मांडायला सुरूवात केली आहे. अर्थात, हा हिशोब ते मनातल्या मनात मांडत होते. वरकरणी मात्र गांधी घराण्याचे या देशावर किती उपकार आहेत अशी भाषा ते वापरत होते. आता मात्र कॉंग्रेसचे माजी मंत्री मणिशंकर अय्यर यांनी स्पष्टपणे जाहीर केले आहे की गांधी घराणे आम्हाला सत्तेसाठी हवे आहे. काही लोकांना नको असताना आणि अप्रिय असतानाही सत्य बोलण्याची खुमखुमी असते. ते सत्य बोलणे कोणाच्याच ङ्गायद्याचे नसते तरीही ही बोलकी भांडी बोलत राहतात आणि जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करतात.

मणीशंकर अय्यर यांचा अशा ङ्गटकळ कॉंग्रेस नेत्यांत दुसरा क्रमांक लागतो (पहिला क्रमांंक अर्थातच दिग्विजयसिंग यांचा). त्यांनी नको त्या वेळी गांधी-नेहरू घराण्याविषयीचे सत्य जगजाहीर केले आहे. कॉंग्रेसचे नेते या घराण्याविषयी ङ्गार भरभरून बोलत असतात. नेहरू कसे मोठे होते, इंदिरा गांधी किती करारी होत्या, त्यांनी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी कसे हौतात्म्य पत्करले आहे हे सांगताना कॉंग्रेस नेत्यांत चढाओढ लागलेली असते. आता पंजाबचे राज्यपाल असणारे शिवराज पाटील यांनी तर संजय गांधी यांना विवेकानंदांचा अवतार म्हटले होते आणि सोनिया गांधी यांना देशाच्या माता म्हटले होते. पण हे सारे वरवरचे आहे, हे घराणे कॉंग्रेस जनांना खरेच मोठे महान वगैरे वाटत नाही.(नाही तरी राहुल, सोनिया आणि प्रियंका यांचा खरा वकूब किती?). हे घराणे ङ्गार महान आहे असे लोकांना वाटते आणि त्याच्याकडे पाहून लोक कॉंग्रेसला मतदान करतात. म्हणून कॉंग्रेसच्या नेत्यांना हे घराणे हवे असते. या घराण्याच्या मागे उभे राहिलो तर आपल्याला ते घराणेच सत्ता मिळवून देते म्हणून आपण त्यांचे गुणगान करत असतो. उद्या चालून त्यांच्या विषयीचे लोकांतले आकर्षण संपले आणि सोनिया गान गाऊन मते मिळत नाहीत असे आढळून आले तर आपण या घराण्याला मान देऊच असे नाही. असे मणीशंकर अय्यर यांनी म्हटले आहे.

स्वातंत्र्यापासून या घराण्याकडेच सत्ता रहात आली आहे. जेव्हा जेव्हा या घराण्याचे नेतृत्व मिळते तेव्हा पक्षाला सत्ता मिळते. त्या शिवाय कोणाकडे पक्षाची सूत्रे गेली तेव्हा की पक्षाला पराभव पत्करावा लागतो. तेव्हा आता तरी गांधी घराणे हीच कॉंग्रेसची जमेची बाजू आहे. अय्यर यांनी सत्य बोलण्याचा आव आणून हे प्रतिपादन केले असले तरी ते सत्य नाही. १९७७ साली केन्द्रातली सत्ता पहिल्यांदा कॉंग्रेसच्या हातातून गेली तेव्हा पक्षाचे आणि सरकारचे नेतृत्व इंदिरा गांधी यांच्याकडे होते. नंतर १९८९ साली राजीव गांधी यांच्या हातून सत्ता गेली. तेव्हाही अन्य कोणाच्या हातात सत्ता नव्हती. अर्थात ही तर वस्तुस्थिती आहे पण माणसाला लोभ सुटला की तो सोयिस्कर सत्य बोलतो. अय्यर आता आताची गोष्ट बोलत आहेत. सीताराम केसरी आणि नरसिंहराव यांच्या हातातून सत्ता गेली याचाच केवळ दाखला देत आहेत. पण आता ते म्हणतात तशी स्थिती काही बाबतीत तरी १०० टक्के तशीच आहे. आता कॉंगे्रेसकडे या घराण्याशिवाय अन्य कोणतेही मत खेचणारे साधन नाही. निदान आता तरी ते दिसत नाही. म्हणून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मत खेचण्याची आपली ताकद वाढवावी लागणार आहे. त्यांना धट्टेकट्टे रहावे लागेल. आजारी पडून चालणार नाही.

अय्यर यांनी सोनिया आणि राहुल यांना जणू कानशिलावर पिस्तूल रोखून बजावले आहे. मते खेचून आणाल तर खैर आहे. पण ती शक्ती गमावून बसाल तर कॉंग्रेस पक्ष तुम्हाला ङ्गेकून दिल्या शिवाय राहणार नाही. सोनिया गांधींनी गतवर्षी आपल्या वाढदिवसाला आपले मनोगत व्यक्त केले. वयाची ७० वर्षे पूर्ण होतील तेव्हा म्हणजे २०१६ साली निवृत्त होऊ असे त्यांनी म्हटले. परंतु अजून तरी आपल्याला सत्ता मिळवून देतील असे कॉंग्रेसजनांना वाटत आहे. त्यांनी सोनिया गांधींच्या निवृत्तीला विरोध केला आणि सोनिया गांधींनासुध्दा आपण निवृत्त होणार नसल्याचे जाहीर करावे लागले. त्यांच्या आजाराची अवस्थाही तशीच झालेली आहे. त्या आजारी असल्याचे सत्य दडवून ठेवावे लागत आहे. अलाहाबाद जिल्हा कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोनिया गांधी नेहमी आजारी असल्याने त्यांच्या ऐवजी प्रियंका गांधींनी पुढे यावे अशी भावना व्यक्त केली. कॉंग्रेस पक्षामध्ये असणारी नेतृत्वाची दरी कमी करण्यासाठी प्रियंका गांधीची गरज आहे. असे या कार्यकर्त्यांना वाटते. त्यांचाही मतलब तोच आहे. सोनिया असो की प्रियंका असो गांधी घराण्याचा कोणीतरी नेता असावा असे त्यांना वाटते. मात्र सोनिया गांधी सक्षम असताना आणि राहुल गांधी धडाकेबाजपणे लिहून दिलेली भाषणे करत असताना प्रियंका गांधींची गरजच काय असे कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे मत आहे. मात्र या वादामध्ये सोनिया गांधी आजारी आहेत. असे म्हणणे पक्षाच्या हिताचे नाही. म्हणून आलाहाबादमध्ये तशी पोस्टर्स लावणार्‍या कार्यकर्त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. एकंदरीत सोनिया, राहुल आणि प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाची मार्केट व्हॅल्यू हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे.