शाहदोल – देशातील जवळपास 70 टक्के लोकसंख्येस अतिस्वस्त दरात अन्नपुरवठा करण्याची ग्वाही देणारे अन्नसुरक्षा विधेयक संमत झाले तेव्हा प्रकृती अस्वास्थ्यामुळे हजर राहू न शकल्याने माझ्या आईस अतिव दु:ख होऊन त्यांनी आश्रू ढाळल्याचे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी मध्य प्रदेशातील एका सभेत बोलताना सांगितले.
हे आपल्या आईचे स्वप्न होते त्यामुळे भविष्यातील एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसला गरिबांचा विकास हवा आहे त्यामुळेच केंद्रातील संपुआ सरकारने गरिबांना अन्न-धान्याचा अधिकार मिळवून दिला. हे विधेयक माझ्या आईचे स्वप्न होते त्यामुळेच हे विधेयक ज्या दिवशी संसदेत मंजूर होणार होते त्या दिवशी सोनिया गांधी यांना बरे वाटत नसल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
संसदेमध्ये या विषयावरील चर्चेस गांधी या उपस्थित होत्या मात्र मतदानाच्या वेळी त्या उपस्थित राहू शकल्या नव्हत्या. राहुल यांनी याविषयी गुरुवारी बोलताना या विधेयकासाठी सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसतानाही त्या हजर राहिल्याचे सांगितले. अखेर मी तिला रुग्णालयात नेले. आम्ही रुग्णालयात गेलो तोपर्यंत तिला नीट श्वास घेता येत नव्हता. मात्र या विधेयकाकरिता मी संघर्ष केला व आता मला या विधेयकावर मतदान करता येणार नाही, या कारणाकरिता तिला अतिव दु:ख होऊन तिच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले, असे राहुल यांनी सांगितले.