बाद करण्यासाठी शब्दांचा खेळ केला- मुंडे

मुंबई – एमसीएच्या निवडणुक रिंगणातून बाहेर फेकले गेलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी आरोपांचा पाढाच वाचला आहे. यासाठी खास पत्रकार परिषद मुंडे यांनी घेतली होती. निवडणुकीतून बाद करण्यासाठी शब्दच्छल करण्यात आल्याचा आरोप मुंडे यांनी या पत्रकार परिषदेत केला आहे. तसेच, शरद पवार तब्बल 10 वर्षे एमसीएचे बेकायदेशीरपणे अध्यक्ष राहीले अशी आरोपाची तोफ त्यांनी पवारांवर डागली आहे.

एमसीए अध्यक्ष रवी सावंत यांच्यासमोर सुनावणी झाल्यानंतर मुंडे एमसीए निवडणूकीतून आऊट झाल्याचे निश्चित झाले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. माझ्या वकिलांनी मुंबईतील रहिवासाची सर्व प्रमाणपत्रं एमसीएसमोर सादर केली होती. तरी देखील एमसीए अध्यक्षांनी मला या निवडणूकीतून बाद केले, असा आरोप मुंडे यांनी केला आहे.

मुंडे यांच्या म्हणण्यानुसार दोन कारणांनी त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. रेसिडेन्स’ आणि रेसिडेण्ट’ असा शब्दांचा घोळ घालून मला रिंगणाबाहेर केले आहे, असे स्पष्टीकरणही मुंडे यांनी यावेळी दिले.

Leave a Comment