नवीन पटनायक यांनी हात झटकले

भुवनेश्‍वर – आदित्य बिर्ला उद्योग समूहाचे चेअरमन कुमार मंगलम् बिर्ला आणि कोळसा खाण विभागाचे माजी सचिव पी.सी. पारख यांच्याशी संबंधित असलेल्या ओदिशातील तालबीरा कोळसा खाणीच्या आवंटनातील भ्रष्टाचाराशी आपला काहीही संबंध नाही, असे ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी स्पष्ट केले आहे. २००५ साली त्यांनी बिर्ला उद्योग समूहाला ही खाण आवंटित करावी असे पत्र दिले होते, असे आता उघड झाले आहे. श्री. नवीन पटनायक यांनी पत्र दिल्याची गोष्ट मान्य केली आहे. मात्र ते पत्र देण्यामागे कसलाही भ्रष्टाचार नाही. ओदिशाच्या हिताचा विचार करूनच केवळ आपण ते पत्र दिले होते असे त्यांनी म्हटले आहे.

नवीन पटनायक यांनी या पत्रामध्ये झारसुगुडा जिल्ह्यातील तालबीरा येथील खाण बिर्ला उद्योग समूहाला द्यावी, अशी शिङ्गारस केली होती. मात्र त्या शिङ्गारसीमध्येे आपण, अशा प्रकारे खाजगी उद्योग समूहाला कोळसा खाण आवंटित करावी की नाही याचा विचार पंतप्रधानांनी करावा, असे सूचित केले होते. ही खाण बिर्लांना द्यावी असा आग्रह धरला नव्हता, असे नवीन पटनायक यांच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात नवीन पटनायक यांचीही साक्ष घेतली जाणार असल्याचे काल सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले होते. मात्र आपण कोणत्याही प्रकरच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत, असे पटनायक यांनी म्हटले आहे.