तलवार दांपत्यानेच आरुषीचा खून केला

गाझियाबाद – दिल्लीतील नामवंत दंतवैद्य राजेश आणि त्यांची डॉक्टर पत्नी नुपूर तलवार या दोघांनीच आपली कन्या आरुषी आणि नोकर हेमराज या दोघांची हत्या केली आहे, असा थेट आरोप काल न्यायालयात सीबीआयच्या वकिलाने केला. आरुषी खून प्रकरणाचा तपास बर्‍याच दिवसांपासून सुरू आहे आणि कायद्याच्या सगळ्या शक्यतांचा वापर करून तलवार दांपत्य या प्रकरणाची सुनावणी सतत लांबणीवर पडावी यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु तीन दिवसापूर्वी त्याची सुनावणी सुरू झाली आणि सीबीआयच्या वकिलाने प्रथमच या पती-पत्नीवर आपल्या कन्येच्या खुनाचा थेट आरोप केला.

दिल्लीजवळच्या नोएडा भागातील आपल्या निवासस्थानी १६ मे २००८ रोजी या दोघांनी चौदा वर्षे वयाच्या आरुषीचा खून केला आणि दुसर्‍या दिवशी हेमराज या आपल्या नोकराची हत्या केली. या संबंधातील अनेक पुरावे सीबीआयने समोर आणले आहेत. विशेषत: या कुटुंबाची मोलकरीण भारती हिची साक्ष महत्वाची आहे, शिवाय त्यांच्या घराचा दरवाजा हा मुख्य पुरावा आहे. परंतु डॉक्टर तलवार यांनी तपास सुरू झाल्यानंतर हा दरवाजा हटवला. खून केल्यानंतर रक्त सांडून ङ्गरशी खराब झाली होती, ती स्वच्छ धुऊन घेतली आणि त्या खोलीला आधी होता तोच रंग पण नव्याने दिला. इत्यादी गोष्टी सीबीआयने समोर आणल्या आहेत.

गाझियाबादच्या सत्र न्यायालयामध्ये हा खटला सुरू आहे. सीबीआयच्या तपासानंतर हाती आलेले पुरावे समोर ठेवले जात आहेत. त्यांचे हे काम संपल्यानंतर बचाव पक्षाचे वकील आपले म्हणणे मांडतील. या प्रकरणातील बळी ठरलेली आरुषी ही डॉक्टर दांपत्याची कन्या हेमराज या नोकराच्या प्रेमात पडली होती. मात्र ही गोष्ट या दांपत्याला अप्रतिष्ठेची वाटत होती म्हणून त्यांनी या दोघांचाही खून केला, असा त्यांच्यावर आरोप आहे.

Leave a Comment