खाण्याचे सुद्धा व्यसन असते

भारतामध्ये हृदयविकार, लठ्ठपणा, मधुमेह या तक्रारी वाढत चाललेल्या आहेत. त्यामागे इतर अनेक कारणांबरोबरच खाण्याच्या चुकीच्या सवयी हेही एक कारण आहेच. राष्ट्रीय नमुना पाहणीमध्ये भारतीय लोकांच्या बदलत्या खाण्याच्या सवयींचे प्रतिबिंब उमटलेले दिसत आहे. लोक भरपूर खातात हे तर खरेच आहे. परंतु काही लोक जड अन्न जास्त खातात. तळलेले, तेलकट, गोड पदार्थ अधिक करून खात असल्यामुळे त्यांचे पचन होत नाही आणि जाडी वाढते. परंतु याशिवाय भरपूर खाणारा आणखी एक वर्ग आहे तो म्हणजे खाण्याचे व्यसन असलेला वर्ग. आपल्या देशामध्ये असे काही लोक आहेत की, ज्यांना बर्गर, पिझ्झा अशी मैद्यापासून तयार केलेले पदार्थ दररोजच खावेसे वाटतात. त्यात आता आणखी नवनव्या पदार्थांची भर पडत आहे.

दारू पिणार्‍या माणसाला नियमाने दारू प्यावीशी वाटते, तसे या लोकांना हे जड पदार्थ रोज खावेसे वाटतात. बैठी कामे आणि जड अन्न याचा व्हायचा तोच परिणाम त्याच्या शरीरावर होतो. या लोकांना खाण्याविषयी कितीही आकर्षण असले तरी शेवटी तोंडाची चव म्हणून काही असतेच. मनात खाण्याची खूप इच्छा असते आणि काही तरी अरबटचरबट खावेसे वाटतेच, मात्र एक अवस्था अशी येते की, जिभेची चव जाते. मग ङ्गार खाववत नाही. ग्रामीण भागात जिथे मर्यादित खाद्यपदार्थ उपलब्ध होतात तिथे जिभेची चव गेली की, माणूस खाणे थांबवतो. परंतु शहरामध्ये निरनिराळ्या रुचीचे खाद्यपदार्थ खायला मिळतात. तेव्हा एखादा खाद्यपदार्थ खाऊन पोट भरले आणि त्याचा कंटाळा आला तरी खाणे बंद होत नाही.

दरम्यान दुसर्‍या एखाद्या पदार्थाचे दोन घास खाऊन पुन्हा मूळ पदार्थाकडे वळता येते. किंवा पूर्णपणे नवाच पदार्थ खायला घेतला जातो. अशा या बदलामध्ये द्रवरूप अन्नाचा वापर जास्त होतो. उदा. एका डिशमध्ये भला मोठा क्रिम बर्गर घेतलेला असतो. तो पूर्णपणे खाण्याची क्षमता नसते. परंतु मधूनमधून कोकाकोलासारख्या थंड पेयाचे किंवा एखाद्या ङ्गळाच्या रसाचे घुटके घेत घेत तो बर्गर संपवला जातो. एवढेच नव्हे तर नवा मागवला जातो. एकंदरीत क्षमता नसताना दोन बर्गरही खाल्ले जातात आणि थंड पेयाच्या रूपाने भरपूर साखर पोटात गेलेली असते. ही खाण्याची सवय वय वर्षे १५ ते २९ या वयोगटात जास्त आहे. या वयोगटातले ६६ टक्के लोक अशा पद्धतीने आकंठ खात असतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही