आयसॉन धुमकेतू फुटण्याची शक्यता?

पॅरिस – या वर्षअखेर नभांगण उजळून टाकणारा शतकातील सर्वात तेजस्वी धुमकेतू आकाशात दाखल होणार असल्याच्या बातम्या झळकत असतानाच हा धुमकेतू कदाचित फुटेल व त्यामुळे तो अपेक्षित स्वरूपात दिसू शकणार नाही असा अंदाज खगोलशास्त्रज्ञांनी वर्तविला आहे. हा धुमकेतू म्हणजे भ्रमाचा भोपळा ठरेल असा या संशोधकांचा कयास आहे.

रशियातील दोन शास्त्रज्ञांनी प्रथम या धुमकेतूचा शोध २१ सप्टेंबर २०१२ ला लावला. इंटरनॅशनल सायंटिफिक ऑप्टीकल नेटवर्क टेलिस्कोपचा वापर त्यासाठी केला गेला होता व त्यामुळे या धुमकेतूचे नांव आयएसओएन असे केले गेले होते. सूर्याभोवती प्रदक्षिणा करताना तो डिसेंबरमध्ये पृथ्वीवरून अतिशय तेजस्वी दिसणार आहे. परिणामी त्याला ख्रिसमस कॉमेट, कॉमेट ऑफ द इयर अशीही नांवे दिली गेली आहेत. मात्र नवीन आकडेमोडीनुसार या धुमकेतूचे तेजस्वी व नयनरम्य दर्शन होणे कठीण आहे असे कोलंबियातील खगोलतज्ञांचे मत आहे.

बहुतेक सर्व धुमकेतू सूर्याच्या जवळ जातात तेव्हा तेजस्वी दिसतात मात्र हा धुमकेतू सूर्याच्या इतका जवळ जाणार आहे की त्याला सूर्याच्या २८०० डिग्री तापमानाचा सामना करावा लागणार आहे. परिणामी त्याच्यावरील धुळ, बर्फ यांची मोठ्या प्रमाणात वाफ होईल आणि हा धुमकेतू फूटू शकेल. यापूर्वीही असे चार धुमकेतू सूर्याजवळ येऊन फुटल्याच्या घटना घडल्या आहेत १९९४ साली शूमेकर लेव्ही ९ हा महाप्रचंड धुमकेतू याच प्रकारे फुटला होता.

मात्र संशोधकांनी अजूनही आयसोन सूर्याच्या तापमानातून वाचेल आणि अपेक्षित स्वरूपात दर्शन देईल अशी आशा वाटते आहे.