हिंदाल्कोच्या कार्यालयातून २५ कोटी रुपये जप्त

मुंबई – भारतातल्या बहुचर्चित कोळसा घोटाळ्यामध्ये आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमारमंगलम् बिर्ला तसेच त्यांची हिंदाल्को ही कंपनी आणि कोळसा खात्याचे सचिव पी.सी. पारेख यांच्यावर गुन्हे दाखल केल्यानंतर सीबीआयच्या अधिकार्‍यांनी हिंदाल्कोच्या विविध ठिकाणच्या कार्यालयांवर धाडी टाकून २५ कोटी रुपयांची बेहिशोबी रोख रक्कम जप्त केली. या रकमेची कल्पना आयकर खात्याला देण्यात आलेली आहे, अशी माहिती सीबीआयच्या अधिकार्‍यांनी दिली.

सीबीआयच्या अधिकार्‍यांनी या रकमेची बातमी दिली असली तरी हिंदाल्कोच्या अधिकार्‍यांनी मात्र रोख रक्कम जप्त झाल्याच्या बातमीला दुजोरा दिलेला नाही. सीबीआयने मात्र हिंदाल्कोच्या सहा कार्यालयांवर धाडी टाकल्याचे म्हटले आहे. दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि भुवनेश्‍वर या चार ठिकाणच्या या कार्यालयांमध्ये हे धाडसत्र सुरू होते. दिल्लीतील युको बँक बिल्डींगच्या चौथ्या मजल्यावर हिंदाल्कोचे एक कार्यालय आहे. त्या कार्यालयात तपास सुरू असताना २५ कोटी रुपयांची ही रक्कम सापडली.

सीबीआयने नुकताच हिंदाल्को, बिर्ला आणि पारेख या तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. २००४ साली ओडिशातील कोळसा खाणीचे वाटप करताना पारेख यांनी हिंदाल्को कंपनीला झुकते माप दिले आणि त्यावेळी हिंदाल्को कंपनीशी हातमिळवणी केली, असा त्यांच्यावर आणि हिंदाल्कोवर आरोप आहे.

Leave a Comment