नवी दिल्ली – काळा पैसा दडवून ठेवण्यासाठी स्वीस बँकांचा वापर होतो हे तर सगळ्यांनाच माहित झाले आहे. परंतु, आता स्वीस सरकारनं या बँकांमधील खातेदारांची माहिती आणि इतर तपशील भारतासह इतर देशांना देण्यासाठी तयारी दर्शविली आहे. यामुळे या बँकांच्या खात्यात काळा पैसा दडवून ठेवणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
काळ्या पैशाच्या गुंतवणूकदारांची माहिती स्वीस बँकांकडून मिळवून त्यांच्यावर खटला चालविणे यामुळे शक्य होणार आहे. या बँकांच्या खातेदारांचे तपशीलही उपलब्ध होऊ शकतील. गेल्या अनेक वर्षांपासून भारतासह जगभरातील अन्य काही देशांनी स्विस बँकांमधील खात्यांचा तपशील देण्याची मागणी लावून धरली होती.
स्वित्झर्लंडमध्ये अर्थविषयक, तसेच बँक खात्यांतील माहिती गुप्त ठेवली जाते. मात्र, आता ही माहिती देण्यास सरकारने तयारी दर्शवली आहे. यासाठी स्वीस सरकारने भारतासह जगभरातील 58 देशांसोबत ओईसीडी करार’ केला आहे. या करारांतर्गत स्वीस बँकांमधील खातेदारांची तसंच त्यांनी केलेल्या देवाण -घेवाणीची माहिती भारत सरकारला उपलब्ध होऊ शकेल. करारबद्ध देशांना स्वीस बँकांमधील माहिती देणार असल्याचे स्वीस फेडरल काऊन्सिल’ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.