माओवादी हल्ल्यात तीन पोलिस शहीद

गडचिरोली- गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील बडा झरीया गावाजवळ गुरुवारी रात्री झालेल्या माओवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलिस शहीद झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बडा झरीया गावाजवळ माओवाद्यांचा शोध घेण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन करणा-या विशेष पोलिस दलाच्या जवानांवर माओवाद्यांनी भूसुरूंग स्फोट आणि गोळीबार केला. यात निशांत भोरे (गोंदिया), रवी शुरजनवार (दामरेंचा) आणि सत्यवान कुसनवार (गडचिरोली) हे तीन पोलिस जवान शहीद झाले.

छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव जिल्ह्याला लागून असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील सीमेवरील बडा झरीया गावाजवळ माओवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार विशेष पोलिस दलाचे हे पथक माओवाद्यांचा शोध घेण्यासाठी गेले होते. बुधवारी रात्री 11 ते गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान, मुरुमगावपासून 15 किलोमीटर अंतरावरील बडा धारी या गावाजवळ हे पोलिस पथक येताच दबा धरुन बसलेल्या माओवाद्यांनी भूसुरूंग स्फोट घडवून आणला आणि पोलिसांवर गोळीबार केला. यात तीन पोलिस जवान शहीद झाले.

या हल्ल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. मात्र हे घटनास्थळ अतिदुर्गम भागात असल्याने मदतकार्यात आणि शोधकार्यात अडचणी येत आहेत.

Leave a Comment