भुवनेश्वर – वादळ आणि पुराचा तडाखा बसलेल्या ओडिशातील पाच जिल्ह्यांमधील परिस्थिती सुरळीत होण्याच्या मार्गावर असली तरी या जिल्ह्यांतील 647 गावांमध्ये अद्याप पूरस्थिती आहे. दरम्यान मृतांचा आकडा 28 वर पोहोचला आहे.

राज्यातील महत्त्वाच्या नद्यांना आलेला पूर ओसरल्याने मदत कार्याला वेग आला आहे. बलासोर जिल्ह्यात मदतकार्यासाठी तैनात करण्यात आलेले सैन्य, नौदल आणि हवाई दलाचे जवान मागे घेतले असून, राष्ट्रीय आपत्ती कृती दलाच्या जवानांमार्फत मदतकार्य राबवण्यात येत आहे.
जिल्ह्यातील बास्ता, भोगराई, जलेस्वर आणि बालिपल वगळता अन्य भागातील पाणी ओसरले आहे. मात्र 83 पंचायतीमधील 647 गावांमध्ये अद्याप पूरस्थिती असल्याचे विशेष मदत आयुक्त पी. के. मोहापात्रा यांनी सांगितले. पूरस्थिती ओसरल्याने जवळपास 80 टक्के लोकांना मदत छावण्यांमधून सोडण्यात आले असून, 96 हजार लोक अद्याप मदत छावण्यांमध्ये असल्याचे महसूल विभागीय आयुक्त अरविंद पाथी यांनी सांगितले.
भद्रक जिल्ह्यातही जवळपास 70 गावांमध्ये पूरस्थिती असून, 1.73 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलेले आहे. पूरग्रस्त नागरिकांची सुटका करणे व त्यांना मदत पोहोचवणे हे आमचे प्रथम उद्दिष्ट असल्याचे मोहापात्रा यांनी सांगितले.