अलाहाबाद – प्रियंका गांधी यांना ङ्गुलपूर मतदारसंघातून उभे राहण्याचा आग्रह करण्याकरिता भित्तीपत्रिका छापून अनावश्यक पुढाकार घेणारे अलाहाबाद जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस हसीब अहमद आणि श्रीशचंद्र दुबे या दोघांना प्रदेश कॉंग्रेस कमिटीने पक्षातून निलंबित केले आहे. यांनी या निमित्ताने छापलेल्या भित्तीपत्रिकेमध्ये, प्रियंका गांधी यांना केलेला आग्रह कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आणि तसे करताना सोनिया गांधी नेहमी बिमार असतात असा उल्लेख केला. पक्षाच्या अध्यक्षांची प्रतिमा अशी मलीन केल्याबद्दल त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
दुबे आणि हसीब महमद यांनी प्रसिद्ध केलेल्या आणि अलाहाबाद जिल्ह्यात विविध ठिकाणी लावलेल्या या पोस्टर्समध्ये खालील कविता प्रसिद्ध करण्यात आली होती. तिच्यामध्ये ‘मैय्या अब रहती बिमार, भैय्या पर बढ गया भार, प्रियंका ङ्गुलपूरसे बनो उम्मिदवार, पार्टी का करो प्रचार, कॉंग्रेसकी सरकार बनाओ तिसरी बार’ असे काव्य करण्यात आले होते. पण या कवितेतले यमक जुळविण्यासाठी सोनिया गांधी यांना बिमार म्हटले गेले आणि त्यामुळे त्यांच्या प्रतिमेवर परिणाम झाला म्हणून या दोघांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
वास्तविक पाहता प्रियंका गांधी यांना ङ्गुलपूरमधून उभे राहण्याचा आग्रह अलाहाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या बैठकीत एकमुखी ठरावाद्वारे करण्यात आलेला होता. कॉंग्रेसच्या नेत्यांनी प्रियंका गांधी यांना मैदानात उतरवणार नसल्याचे वारंवार स्पष्ट केले असूनही कार्यकर्ते तसा आग्रह धरत आहेत. परंतु या आग्रहामुळे राहुल गांधी हे पक्षाला नेतृत्व देण्यास सक्षम नाहीत, असे प्रतित होते आणि ती गोष्ट राहुल गांधी यांच्याही प्रतिमेला बाधक ठरणारी आहे. प्रियंका गांधींविषयीचा कार्यकर्त्यांचा आग्रह समजू शकतो, परंतु तो अनाठायी आणि अनावश्यक पद्धतीने धरला जात असल्याने नकळतपणे पक्षाचे नुकसान होत आहे. पण ही गोष्ट या कार्यकर्त्यांना समजत नाही. त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते अस्वस्थ झाले आहेत.