सिंचन घोटाळ्याची कागदपत्रे चितळे यांच्याकडे देणार- तावडे

मुंबई (प्रतिनिधी) – राज्यातील सिंचन घोटाळ्याची चौकशी करणार्‍या डॉ. माधव चितळे समितीने या प्रकरणातील सर्व कागदपत्रे देण्यास सांगितले असून मी स्वतः व भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस याच आठवड्यात औरंगाबाद येथे जाऊन समितीचे प्रमुख डॉ. माधव चितळे यांची भेट घेऊन त्यांना घोटाळ्याशी संबंधित सर्व कागदपत्रे व पुरावे देणार आहोत, अशी माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

या समितीने प्रामाणिकपणे चौकशी केल्यास लालूंप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री सुनिल तटकरे यांना तुरुंगात जावे लागेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यापूर्वी विनोद तावडे यांनी दिलेली सिंचन घोटाळ्याशी संबंधित सर्व कागदपत्रे स्विकारण्यास चितळे समितीने नकार दिला होता. याविरोधात विरोधी पक्षाने राज्यपालांकडे तक्रारही दाखल केली होती. या घोटाळ्याची चौकशी करणारी चितळे समितीच बनावट असल्याचा तसेच समितीतर्फे आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही विरोधकांनी केला होता.

विरोधकांच्या आरोपानंतर चितळे समितीच्या पवित्र्यात बदल झाला आहे. सिंचन घोटाळ्याशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि माहिती समितीला पुरवा अशा आशयाचे पत्र समितीने आपल्याला पाठवले आहे. त्यानुसार मी स्वतः व भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस याच आठवड्यात औरंगाबाद येथे जाऊन समितीचे प्रमुख डॉ. माधव चितळे यांना घोटाळ्याशी संबंधित सर्व कागदपत्रे व पुरावे देणार आहोत. असे विनोद तावडे यांनी सांगितले. महाराष्ट्राला काळीमा फासणार्‍या आणि राज्याच्या आजी-माजी मुख्यमंत्र्यांचा कथित सहभाग असलेल्या बहुचर्चित आदर्श घोटाळ्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी करणा-या समितीचा अहवाल विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून सादर करावा. अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

सरकारला सादर केलेल्या समितीच्या अहवालात सत्ताधारी राजकारण्यांवर ठपका ठेवला असल्यामुळे हा अहवाल आघाडी सरकारला अडचणीचा ठरु शकतो. त्यामुळेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदर्शचा अहवाल सादर करण्यास विलंब लावत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Leave a Comment