मोदी हा तर बुडबुडा, लवकरच फुटेल – सिब्बल

नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविषयी कॉंग्रेसला कसलीही भीती वाटत नाही, कारण मोदींची अमाप प्रसिद्धी हा एक बुडबुडा आहे आणि तो आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे लवकरच फुटणार आहे, असे मत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. जो वर चढतो तो कधी ना कधी खाली उतरतोच, हा निसर्गाचा नियम आहे आणि तो नरेंद्र मोदींना लागू पडणार आहे असे सिब्बल म्हणाले.

नरेंद्र मोदी यांना सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळालेली आहे आणि त्या बाबतीत कॉंग्रेस पक्ष मोदींच्या मागे आहे. या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधले असता श्री. सिब्बल यांनी, ‘हाताशी माणसे असल्यामुळे नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर प्रसिद्धीचा देखावा निर्माण केला आहे. तो भ्रामक आहे आणि लवकरच त्याची सुद्धा हवा उतरेल’, असे निदान केले.

नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये केलेली प्रगती आणि विविध मतदार सर्वेक्षणात त्यांना मिळणारा पाठींबा या संबंधात विचारले असता या दोन्ही गोष्टी विश्‍वासार्ह नाहीत असे श्री. सिब्बल म्हणाले. थोड्याच दिवसांपूर्वी पी. चिदंबरम् यांनीही असेच निदान केले होते आणि नरेंद्र मोदी हे वाजपेयी किंवा अडवाणी यांच्यासारखे लोकप्रिय नाहीत असे म्हटले होते. नरेंद्र मोदी यांना मिळणारा कथित पाठींबा हा अतिशयोक्त स्वरूपात माध्यमातून दाखवला जात आहे. हा पाठींबा म्हणजे केवळ माध्यमांची निर्मिती आहे, असेही चिदंबरम् यांनी म्हटले होते. त्यांच्या या प्रतिपादनाची आठवण कपिल सिब्बल यांच्या या मुलाखतीत झाली.

नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत पी. चिदंबरम् हे असे सावधपणे बोलले असले तरीही त्यांनी मोदी यांना भारतीय जनता पार्टीमध्ये ऐक्य निर्माण करण्याबाबत चांगले मार्क दिले. मोदी यांची भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड झाल्यापासून भाजपातले मतभेद आणि गटबाजी कमी झाली आहे. भाजपाचे नेते एकदिलाने कामाला लागले आहेत, असे चिदंबरम् यांनी म्हटले होते.

Leave a Comment